नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सराफ व्यावसायिक गुरव बापलेकांच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रशांत गुरव यांनी आम्लयुक्त विष प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. तर, त्यांचा मुलगा अभिषेक याच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समोर आले नसून ते पडताळण्यासाठी पंचवटी पोलीसांनी (Panchavati Police) गुरव बापलेकांचे ‘व्हिसेरा सँम्पल’ पंचवटीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले आहे. दरम्यान, प्रशांत यांनी आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या आर्थिक टिपण व सुसाईड नोटचाही तपास केला जात असून गुरव यांच्या कुटुंबासह नातलगांकडून फिर्याद व तक्रार येताच, संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.
सराफ व्यावसायिक प्रशांत आत्माराव गुरव(वय ४९) आणि त्यांचा मुलगा अभिषेक(वय २९, रा. रामराज्य संकुल, काळाराम मंदिरासमोर, पंचवटी, मूळ रा. ता. विटा. जि. सांगली) यांचे सोमवारी (दि. १३) सकाळी घरातच संशयास्पद मृत्यू झाले हाेते. दरम्यान, पाेलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामे तयार करुन मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले हाेते. यानंतर, शवविच्छेदन अहवालात प्रशांत यांनी विषप्राशन (Poisoning) करुन गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, अभिषेकच्या मृत्यूचे नेमके कारण समाेर आले नसल्याने व्हिसेरा प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, हे अहवाल मिळताच त्यातील अभिप्रायानुसार पुढील कायदेशिर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच, अभिषेकचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की, त्याने देखिल आत्महत्या केली किंवा त्याला विष पाजण्यात आले का, याचाही उलगडा फाॅरेन्सिक अहवालातून निष्पन्न हाेणार आहे. त्यामुळे आता पाेलीस (Police) या अहवालांच्या प्रतिक्षेत असून दाेन्ही आकस्मिक मृत्यूंच्या नाेंदींचा तपास उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड करत आहेत.
आर्थिक व्यवहाराचे कारण?
प्रशांत यांनी सुसाईड नाेटमध्ये केलेल्या उल्लेखात साेलापूरातील कुमेढ नाका येेथील जागा हक्क साेड संदर्भाने संशयित दिलीप सचदेव उर्फ मोहन सचदेव, अमोल यादव यांच्याशी माझा न्यायालयासमक्ष व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. मोहनशेठ यांना पाच कोटी रुपये व अमोलचे डीपॉझिट एक कोटी वजा करायचे, असे ठरले असतानाही दोघे आता ऐकायला तयार नाहीत. मोहनशेठ यांनी २५ टक्के रक्कम घ्यावी, यादववे दिलेला शब्द पाळावा, ७५ टक्के हिस्सा गुरव फॅमिलीला द्यावा असे चिठ्ठीत नमूद आहे. यासह प्रशांत यांनी इतरांकडून घेतलेल्या व इतरांना दिलेल्या रकमेचाही हिशेब आहे. या संशयित व्यक्तिंकडून पैसे घेणे बाकी असून ‘ही मला त्रास देणारी माणसे’ असेही त्यांनी लिहिले आहे. त्यानुसार, संशयितांच्या आर्थिक छळाला कंटाळून गुरव यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात येते आहे.
मुद्दे
गुरव कुंटुंबाची तक्रार येताच गुन्हा नाेंदविणार
फाॅरेन्सिक अहवालातून अनेक गाेष्टींचा उलगडा शक्य
सुसाईड नाेटमधील मजकुरासह अन्य बाबींची पडताळणी
साक्षीदार व कुटुंबाचे जबाब नाेंदविणे सुरु
गुरवांच्या घरातून महत्त्वाच्या नाेंदी व कागदपत्रांची तपासणी