
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगरीत भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांचा अभूतपूर्व जनसागर लोटला आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसर आणि पवित्र कुशावर्त तीर्थ परिसर ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गजबजून गेला होता.
कुशावर्त तीर्थावर ४ लाखांहून अधिक भाविकांची नोंद
श्रावणी सोमवारच्या औचित्याने भाविकांनी कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नान करून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित यंत्रणा आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. या एआय यंत्रणेच्या आकडेवारीनुसार, दुपारी साडेचार वाजेपर्यंत कुशावर्त परिसरात तब्बल ४ लाख ९ हजार २०३ भाविकांची उपस्थिती नोंदवली गेली. यात गायत्री गेटमधून ७ हजार २५७, तर पूर्व प्रवेश मार्गातून १२ हजार ८० भाविकांची नोंद झाल्याचे स्क्रीनवरील आकडेवारीत दिसत आहे.
प्रशासन व पोलिसांचा चोख बंदोबस्त
श्रावण सोमवारनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थान, नाशिक ग्रामीण पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण, दर्शन रांगेचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. एआय प्रणालीमुळे गर्दीवर थेट लक्ष ठेवणे शक्य झाल्याने प्रशासनाला गर्दीचे नियोजन करणे अधिक सुलभ झाले.




