नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील वाहतूक शिस्तीवर (Traffic Rules) डिजिटल चाबूक बसल्याचे चित्र दिसले. २० फेब्रुवारी २०२६ रोजी ई-चलन कार्यप्रणाली प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. २१) सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल १५० बेशिस्त चालकांना ‘ई-चलन’ बजवण्यात आले आले. नियमभंगाची नोंद होताच दंडाची नोटीस थेट वाहनधारकांच्या मोबाईलवर पोहोचत असून या कारवाईचा धसका घेच अनेकांनी नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील प्रमुख चाळीस सिग्नलवर सीसीटीव्ही (Signal CCTV) आधारित प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, वेगमर्यादा भंग करणे अशा प्रकारांची स्वयंचलित नोंद होऊ लागली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नियमभंग प्रणालीने टिपला होता. त्यानंतर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई सुरू होताच १५० चालकांवर ई-चलन जारी करण्यात आले.
२०१८ पासून प्रलंबित असलेली ही प्रणाली अखेर कार्यान्वित झाली असून नियंत्रण कक्षातून थेट देखरेख सुरू झाल्याने प्रत्येक चौक डिजिटल नजरकैदेत आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिवसभर आढावा घेत कारवाईला वेग दिल्याचे दिसते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कॅमेरे आणि ई-चलन प्रणाली यांची जोड मिळाल्यावर पुढील काळात कारवाई अधिक कठोरपणे राबविण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याशिवाय चालकांपुढे पर्याय उरलेला नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.





