नाशिक | Nashik
नुकतेच राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) हे थेट सभागृहात जंगली रमी गेम खेळत होते, असा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. तसेच कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील विरोधकांकडून केली जात होती. त्यावर आज (मंगळवारी) सकाळी ९ वाजता कोकाटे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली होती. “जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचत असता, किंवा इतर काही वाचत असता तर ते ठिक आहे. पण रमी खेळणं हे काही बरोबर नाही. कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरणं दिलंय, त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटे यांना सुनावलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांच्या या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी काल (सोमवारी) रात्री फोनवरून संवाद साधला. अजित पवारांच्या फोननंतर कोकाटे यांनी सिन्नर येथील दूध संघ कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि कोकाटे यांच्यात काय चर्चा झाली, तसेच कोकाटेंनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकलेले नव्हते. त्यानंतर कोकाटे आज (मंगळवारी) सिन्नर येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषदेत कोकाटे काय निर्णय जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.




