Friday, May 29, 2026
HomeनाशिकNashik News : निफाड कारखाना विक्री होऊ देणार नाही - संघर्ष समितीच्या...

Nashik News : निफाड कारखाना विक्री होऊ देणार नाही – संघर्ष समितीच्या मेळाव्यात सर्वपक्षीय नेते, कामगार, सभासदांचा ठराव

निफाड | Niphad

- Advertisement -

निफाड तालुक्याच्या (Niphad Taluka) अर्थकारणाला गती देवून तालुक्याला वैभवाच्या शिखरावर नेणार्‍या निसाका अर्थात निफाड सहकारी साखर कारखाना बचाव संघर्ष समितीचा कारखाना कार्यस्थळावर आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कामगार, ऊस उत्पादक  व सभासदांनी निसाका विक्री होऊ देणार नाही, हा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच कायदा सुव्यवस्था वेशीला टांगून निसाकाचे भंगार विकणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय मान्यवरांच्या पोलिसांना निवेदन देण्यात आले.

निसाका बचाव संघर्ष समिती, सभासद, कामगार रहिवासी, ऊस उत्पादक शेतकरी आयोजित मेळाव्यात कुठल्याही परिस्थितीत निफाड साखर कारखाना विक्री होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी चालेल पण सभासदांनी मनीमंगळसूत्र मोडून उभारण्यात आलेल्या या कर्मवीराच्या वास्तूला जतन करण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल. प्रसंगी निफाड साखर कारखाना ते मंत्रालय भव्य मोर्चा काढण्यात येईल. परंतु निफाड साखर कारखान्याची विक्री  देणार नाही, संविधानान मार्गाने लढा उभारला जाईल. या लढ्यात सर्वात अग्रभागी मी असेल, असे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी भाषणात बोलताना सांगितले.

जिल्हा परिषद माजी सभापती राजेंद्र मोगल यांनी , मनोगत व्यक्त करताना  कारखान्याच्या सद्यपरिस्थितीची माहिती सभासदांसमोर माडंली. ज्येष्ठ नेते शिवाजीराजे ढेपले  भाषणात म्हणाल की, कारखाना  सभासदांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत सर्व सभासद व कामगार यांची एकजूट होऊन कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, असा निर्धार केला. युवा नेतृत्व हर्षल मोरे यांनी मत मांडताना म्हटले की, कारखान्यात ज्यांनी भंगार विक्रीतून असंख्य कोटीची माया जमवली, त्या सर्वांवर गुन्हा दाखल करून ही सर्व रक्कम वसूल केली जाईल, असे उपस्थितांना आश्‍वासित केले. कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री केला जावू देणार नाही, याची हमी मोगल यांनी दिली.

निफाड कामगार सभेच्या वतीने बी.जी. पाटील, प्रमोद गडाख, विजय रसाळ यांनी कामगार व सभासद यांची रक्कम जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त केला. नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख खंडू पाटील बोडके यांनी सांगितले, जोपर्यंत कारखाना विक्रीस स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत आपला लढा  चालू राहील. प्रसंगी कोणत्याही पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करून कर्मवीरांच्या त्यागाशी प्रतारणा करणार नाही, अशी शपथ उपस्थित जनसमुदायाकडून बोडके यांनी करून घेतली.

दरम्यान, याप्रसंगी मविप्र उपसभापती डी.बी. मोगल, व्ही.एन. नाईक सरचिटणीस दिगंबर गीते, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, भगवान बोराडे, रासाका माजी चेअरमन दत्तात्रय डुकरे, शिवाजीराव मोरे, जगन कुटे, तानाजी पुरकर, विलास मत्सागर, बाळासाहेब जाधव, दिनकर  मत्सागर, अरुण डांगळे, नितीन निकम, सुरेश डांगळे, केशव सुरवाडे, सचिन मोगल, सचिन वाघ, हिरालाल सानप, विनायक खरात, संदीप टर्ले, गोकुळ गीते, सुभाष होळकर, भास्कर शिंदे, विलास गडाख, केशव झाल्टे, सुरेश निकम, शिवाजी शिंदे, माधव सुरवाडे, सुयोग गीते, बंडू बैरागी, गोकुळ झाल्टे, सोमनाथ झाल्टे, नानासाहेब बोरस्ते, नानासाहेब दाते, धोंडीराम रायते,  अनिल पाटील, भूषण शिंदे, सुभाष झोमन, तुषार गांगुर्डे, बाळासाहेब बाविस्कर, प्रमोद मत्सागर, उत्तम गायकवाड, पंढरीनाथ उगले, योगेश आढाव, किरण वाघ, अहमद शेख, सुनील मयूर, भीमराव गायकवाड, बंडू म्हस्के आदींसह तालुक्यातील सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात दै.देशदूतच्या अभिनंदनाचा ठराव

सध्या दैनिक देशदूतमध्ये ‘निसाकाची परवड’ या वृत्तमालेत कारखान्याबाबत जे बेधडक आणि वस्तुस्थिती मांडणारे लेखन छापून  येत आहे. त्यामुळे जनसामान्यांपर्यंत निफाड कारखान्याची सद्यस्थिती पोहोचली आहे. जे प्रयत्न तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व निसाकाची सत्ता भोगणार्‍या आजी-माजी चेअरमन, संचालकांनी निसाका वाचवण्यासाठी  करायला हवे होते. ते काम दैनिक देशदूत वृत्तपत्राने केले असे मनोगत ज्येष्ठ नेते दिलीप मोरे (Dilip More) यांनी व्यक्त केले. त्यामुळे जनतेचा आवाज पोहोचविणारे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांचा विशेष अभिनंदनाचा आणि सत्काराचा ठराव मोरे यांनी यावेळी मांडला. या ठरावाला उपस्थित ऊस उत्पादक, कामगार, सभासदांनी एकमताने सर्वांनी पाठिंबा दिला. 

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 504 दिव्यांग कर्मचार्‍यांची होणार फेरपडताळणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेत नोकरी मिळवण्यासाठी किंवा बदली प्रक्रियेत सवलत घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणार्‍या कर्मचार्‍यांवर आता थेट निलंबनाची कारवाई न करता, त्यांची...