नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक विमानतळावरील (Nashik Airport) सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) घेतला असून, या धावपट्टीसाठी (Runway ) २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार असून नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी १६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या निर्णयानंतर नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित एजन्सीकडून तांत्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा (Tender) प्रक्रिया राबवली जाईल. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. नवीन धावपट्टी ही सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच ३ किलोमीटर लांब व ४५ मीटर रुंद असणार आहे.