नाशिक | विजय संकलेचा | Nashik
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास लोया (Srinivas Loya) यांचे नुकतेच निधन झाले. सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे त्यांचे सुहृद विजय संकलेचा यांनी केलेले हे स्मरण.
काही व्यक्तिमत्त्वे केवळ पद वा अधिकारांमुळे मोठी होत नाहीत; तर ती आपल्या शांत कार्यातून, सातत्यपूर्ण योगदानातून आणि मूल्यनिष्ठ जीवनातून समाजाच्या स्मृतीत अढळ स्थान निर्माण करतात. श्रीनिवास मुरलीधर लोया हे असेच एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यास तो सहकार, शिक्षण आणि समाजकार्य या क्षेत्रांत निःस्वार्थ सेवेला समर्पित होता. त्यांनी ठरविले असते तर ते इतरही क्षेत्रात मुशाफिरी सहज करू शकले असते; परंतु सहकार व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाजकार्य करण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. अखेरपर्यंत त्यांनी हा घेतलेला वसा सोडला नाही.
सन १९५१ मध्ये जन्मलेले निवासशेठ मुळातच अभ्यासू, संयमी व दूरदृष्टी असलेले होते. त्यांनी आयुष्यभर स्वतःपेक्षा संस्था मोठी आणि पदापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. म्हणूनच त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर विचारप्रणाली, मूल्यपरंपरा हरपली, अशी भावना व्यक्त होणे साहजिक आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेपासून झाली. या बँकेचे संस्थापक त्यांचे काका, स्व. श्री. बालमुकुंदजी लोया होते. सन १९८० च्या दशकात, नव्या पिढीला संधी देण्याच्या धोरणांतर्गत निवासशेठ यांची बँकेच्या संचालक मंडळात निवड झाली. सुमारे २० वर्षे त्यांनी या बँकेत संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद कार्यकारी संचालक अशी पदे भूषविली. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता, संगणकीकरण आणि ग्राहकाभिमुखता या मूल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. निर्णय घेताना ते अभ्यासपूर्ण विचार, सामूहिक चर्चा आणि संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करीत असत. याशिवाय, बिझनेस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेत ते सहसंस्थापक म्हणून सहभागी होते.
संचालक व अध्यक्षपदावर काम करताना त्यांच्या अनुभवाचा व संयमाचा बँकेला मोठा लाभ झाला. ते नाशिक जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनचे माजी अध्यक्षही होते. सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान हे नेहमीच संस्थाकेंद्रित राहिले. शहराच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासाबाबत त्यांना विशेष आस्था होती. महानगरपालिकेचे तत्कालीन प्रशासक श्री. रत्नाकर कुलकर्णी यांनी सुचविलेली आर्थिक संस्थांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्यातूनच बंद पडलेली ‘वसंत व्याख्यानमाला’ पुन्हा सुरू झाली. आज गेली तीन दशके आणि त्याहून अधिक काळ ही व्याख्यानमाला अखंडपणे सुरू असून नाशिकच्या बौद्धिक जीवनाचा ती अविभाज्य भाग बनली आहे. मी, निवासशेठ व वसंतराव नगरकर हे नियमित भेटत असल्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने काय करता येईल यावर सातत्याने चर्चा होत असे. त्यामध्ये त्र्यंबकराव गायकवाड व डॉ. डी. जी. पेखळे हेही सहभागी होत. त्या काळात नाशिकरोडकरांसाठी दसक पूल व सोमानी गार्डन यांसारख्या दोन मोठ्या सुविधा उपलब्ध झाल्या. यासह इतर नागरी सुविधांनाही नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेने तेव्हा मोलाचा पाठिंबा दिला.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या ठाम विश्वासातून श्री. वसंतराव नगरकर यांनी एक संकल्पना मांडली. तो धागा पकडून निवासशेठ यांनी नाशिकरोडला इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात उत्तमचंदजी चोरडिया व इतर संचालकही सहभागी झाले. प्रारंभी शिखरेवाडी येथे सुरू झालेल्या या शाळेचा पुढे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने वटवृक्ष झालेला आज आपण पाहतोय. आज या संस्थेअंतर्गत के. एन. केला विद्यालय, ब्ल्यू बेल स्कूल आणि अभिनव मराठी शाळा अशा तीन शाळा कार्यरत आहेत. स्थापनेपासून ते संस्थेचे पदाधिकारी होते आणि गेली १५ वर्षे चेअरमन म्हणून त्यांनी संस्थेला स्थैर्य व दिशा दिली. आज सुमारे ५,००० विद्यार्थी आणि २०० शिक्षकांचा शैक्षणिक परिवार ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे.
श्रीनिवास लोया हे माहेश्वरी समाजाचे विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जात. समाजाचे अध्यक्ष व विश्वस्त म्हणून त्यांनी श्री. अशोक तापडिया यांच्यासमवेत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. भगूरचे रहिवासी असल्यामुळे ते रेणुका (भगवती) देवी मंदिर, भगूर येथील जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष होते. नाशिक सेवा समिती व महेश सेवा समितीचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. धार्मिकता ही त्यांच्या दृष्टीने केवळ विधी नसून सामाजिक जबाबदारीशी जोडलेली मूल्यप्रणाली होती. मनमिळावू स्वभाव, संयत भाषा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि कोणालाही न दुखावता निर्णय घेण्याची कला त्यांची ओळख होती. त्यांचे जीवन हे कर्तव्य, सातत्य आणि मूल्यनिष्ठेचे मूर्त उदाहरण होते. त्यांनी उभारलेल्या संस्था, घडवलेली पिढी आणि दिलेली दिशा यावरच मार्गक्रमण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.




