नाशिक | विजय गिते | Nashik
नाशिक-पुण्यातील तरुणांनी (Nashik-Pune Youth) आपल्या कल्पकतेच्या आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर पृथ्वीपासून तब्बल २५.७ किलोमीटरवर, उणे ५५ अंश सेल्सिअस तापमानातही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय मॉडेल (AI Model) यशस्वीपणे कार्यरत ठेवण्याचा प्रयोग केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण मोहिमेदरम्यान एआय मॉडेलने तब्बल ४११ प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे भारतीय तरुणांच्या संशोधन क्षम तेची आणि नव्या तंत्रज्ञानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची झलक पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. ही मोहीम केवळ बलून उडवण्याची किंवा संगणक अवकाशाच्या दिशेने पाठवण्याची नव्हती.
भविष्यात अवकाशातच डेटा सेंटर उभारता येतील का, तेथील प्रतिकूल परिस्थितीत संगणक आणि एआय प्रणाली अखंडपणे काम करू शकतील का, या महत्त्वाकांक्षी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न होता. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या (Student) ‘बॉस्कॉन स्पेस’९ या संशोधन पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी सोलापूरजवळून हाय-अल्टिट्यूड बलूनचे प्रक्षेपण करून ही चाचणी यशस्वी केली. ३१ ऑक्टोबर रोजी सोलापूरजवळून बलूनचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यावेळी पूर्वेकडून पश्चिम घाटाच्या दिशेने सरकत असलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव या भागात होता. बलून जसजसा उंची गाठत होता, तसतसे पृथ्वीवरील वातावरणाचे वेगळे रूप कॅमेऱ्यांमध्ये कैद होत होते.
बलूनवरील कॅमेऱ्यांनी चारही दिशांना शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेले चक्रीवादळाचे दाट ढग टिपले. या प्रयोगातील सर्वांत मोठे आव्हान होते ते अत्यंत प्रतिकूल वातावरणात संगणक आणि एआय मॉडेल कार्यरत ठेवण्याचे. जमिनीवर सामान्य तापमानात काम करणाऱ्या संगणकीय यंत्रणेला उणे ५५ अंश सेल्सिअस तापमान, कमी हवेचा दाब आणि बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागला. यासाठी विशेष पद्धतीने तयार केलेला पेलोड बलूनसोबत पाठवण्यात आला होता. या पेलोडमध्ये संगणक बसवून त्यावर एआय मॉडेल कार्यान्वित करण्यात आले होते. संपूर्ण उड्डाणादरम्यान हे मॉडेल कार्यरत राहिले आणि त्याने ४११ प्रश्नांची उत्तरे दिली.
या चाचणीमुळे अत्यंत प्रतिकूल वातावरणातही संगणकीय प्रक्रिया सुरू ठेवण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे. या मोहिमेचे नियोजन केवळ प्रक्षेपणापुरते मर्यादित नव्हते, तर प्रयोगातील महत्त्वपूर्ण उपकरणे पुन्हा सुरक्षितपणे मिळवण्याचे आव्हानही पथकासमोर होते. बलूनमधील पेलोड निर्धारित उंची गाठल्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले. प्रक्षेपणस्थळापासून तब्बल ६२.७ किलोमीटर ईशान्य दिशेला ते उतरले. संशोधन पथकाने त्याचा मागोवा घेत पेलोड सुरक्षितपणे परत मिळवला. त्यामुळे प्रयोगातून मि ळालेला डेटा (Data) आणि उपकरणांची स्थिती तपासण्याचा मार्गही मोकळा झाला.
या प्रयोगामागे बॉस्कॉन स्पेसचे दीर्घकालीन उद्दिष्ट अधिक व्यापक आहे. भविष्यात अवकाशात डेटा सेंटर उभारणे आणि पृथ्वीवरून त्यांचा वापर करणे शक्य व्हावे, या दिशेने कंपनी संशोधन करत आहे. भविष्यात अवकाशातील डेटा सेंटर (Data Center in Space) ही संकल्पना प्रत्यक्षात आणता येईल का, याचा शोध या प्रयोगातून घेतला जात आहे. अर्थात, २५.७ किलोमीटरवरील ही चाचणी म्हणजे अवकाशातील डेटा सेंटर उभारण्याचा अंतिम टप्पा नसून त्या दिशेने केलेले प्राथमिक तांत्रिक पाऊल आहे.
तरुण संशोधकांची कल्पक भरारी
या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या मुख्य पथकात आसखेडा (ता. बागलाण) चा श्लोक खैरनार, नांदेडचा आदित्य शिंदे आणि सोलापूरचा पार्थ कैरामकोंडा या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अंतराळ तंत्रज्ञानासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात संशोधन करण्याची त्यांची धडपड विशेष लक्षवेधी ठरली आहे. प्रत्यक्ष प्रयोग, तांत्रिक अडचणी आणि प्रतिकूल वातावरणाचा सामना करत त्यांनी ही मोहीम यशस्वी केली.



