नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वर्षानुवर्षे काँग्रेस (Congress) पक्षासाठी तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या काही इच्छुक उमेदवारांनी नाशिक येथील काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले. यावेळी उमेदवारी (Candidature) नाकारणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : नाशकात भाजपमध्ये मोठा राडा; एबी फॉर्मवरून वाद, कार्यकर्ते आक्रमक
जुना नाशिक (Old Nashik) परिसरात होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पॅनल तयार असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खासदार शोभा बच्छाव, प्रदेश पदाधिकारी शरद आहेर व शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी ऐनवेळी बाहेरच्या व धनाढ्य लोकांना उमेदवारी दिल्यामुळे २५ ते ३० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
पक्षाचा अधिकृत पॅनल तयार असतानाही काही पदाधिकाऱ्यांनी अंधारात पक्षाचा एबी फॉर्म इतर व्यक्तींना दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. काही पदाधिकारी फॉर्म घेऊन इकडून तिकडे फिरत असल्यामुळे पक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचेही आंदोलकांनी सांगितले. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अवघ्या १६ जागांवर ‘मांडवली’ केल्याचा आरोप करत पक्षाची ध्येयधोरणे दावणीला बांधल्याचा आरोप करण्यात आला.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी! पंचवटी प्रभागातून आणखी कुणाला संधी?
दरम्यान, या आंदोलनात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू, अल्पसंख्यांक विभागाचे नाशिक शहराध्यक्ष बशीर, सोशल मीडिया प्रमुख अण्णा मोरे, रामकिसन चव्हाण, फारुख कुरेशी, दाऊद शेख, देवेन मारू, अशोक शेंडगे, संतोष वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





