नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला असताना सायबर गुन्हेगार चांगलेच सरसावले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार आपले जाळे पसरू शकतात. या जाळ्यात आपण अडकू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या सोशल मीडिया आणि मॅसेजिंग अॅप्सवरून Tasksche.exe, Dance Of Hilary.exe, Indianarmy Report.ppt, OperationSindoor.ppt यांसारख्या फाईल्स शेअर केल्या जात आहेत. या exe, .ppt किंवा .pptx फाईल्समध्ये मालवेअर, स्पायवेअर किंवा ट्रोजन हॉर्ससारखा धोकादायक कोड लपवलेला असतो. अशा फाईल्स एकदा उघडल्यावर तुमच्या मोबाईल किंवा संगणकातला वैयक्तिक डेटा, बँक तपशील, फोटो, सोशल मीडिया पासवर्ड सहज चोरीला जाऊ शकतो.
अशी घ्या काळजी
– अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही फाईल्स उघडू नका.
– exe, .apk, .ppt, .doc यांसारख्या अटॅचमेंटस्वर क्लिक करण्याआधी त्या पाठवणाऱ्याची खातरजमा करा.
– मोबाईल व संगणकात अॅन्टी व्हायरस अपडेट ठेवा.
– दोन स्तरांची प्रमाणिकरण (Two-factor authentication) सुरू ठेवा.
– अशा संदेशांना फॉरवर्ड करू नका, अफवा पसरवणे टाळा.
– समजा कोणी या हल्ल्याला बळी पडला तर काय करावे? तत्काळ इंटरनेट बंद करा आणि संभाव्य हानी टाळण्यासाठी डिव्हाईस ऑफलाईन ठेवा.
– सायबर क्राईम पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार दाखल करा.
– बँकिंग माहिती चोरीला गेली असल्यास संबंधित बँकेला त्वरित सूचित करा आणि खाते ब्लॉक करा.
– सोशल मीडिया किंवा ई-मेल अकाऊंटस् हॅक झाल्यास पासवर्ड बदला आणि रिकव्हरी सेटिंग्ज अपडेट करा
शत्रू देश हा नक्कीच तुम्हाला फसवण्यासाठी कॉम्प्युटर आणि मोबाईलवर ओपन होणाऱ्या फाईल्स पाठवू शकतो आणि त्या एम्बेड केल्या असल्यामुळे तुमची सिस्टिम आणि नेटवर्कवर ते हॅक करू शकतात. मागील महिन्यात दहा लाखांपेक्षा जास्त सायबर हल्ले हे भारतावर झाल्याचे उघड झाले आहे.
तन्मय दीक्षित, सायबर संस्कार