घोटी | जाकीर शेख | Ghoti
इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर-दऱ्यांतून कोसळणाऱ्या पावसाने नद्या, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत असून सर्व प्रमुख धरणांतील जलसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. दारणा धरण समूहातील महत्त्वाचे मानले जाणारे भावली धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले असून परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भावली धरण (Bhavli Dam) हे इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या जलसाठ्यांपैकी एक असून या धरणाची एकूण जलसाठा क्षमता १४३४ दशलक्ष घनफूट (दलघफु) म्हणजेच सुमारे २.५ टीएमसी आहे. सततच्या पावसामुळे धरणाने शंभर टक्के क्षमता गाठत ओव्हरफ्लो सुरू केला आहे. धरणातून वाहणाऱ्या पाण्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असली, तरी धरण परिसरात सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दारणा नदीच्या उगमस्थानी, भावली धरण परिसरात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे जलसाठ्यात मोठी भर पडली आहे. त्रिंगलवाडी धरण, तसेच भाम व खापरी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी दारणा नदीपात्रात मिसळत असल्याने दारणा धरणही शंभर टक्के भरले असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महसूल, आपत्ती व्यवस्थापन व पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत इगतपुरी तालुक्यात १०३ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पावसाची नोंद १३०३ मिमीपर्यंत पोहोचली आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश लहान-मोठे बंधारे, तलाव आणि जलसाठेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
यंदा भातशेतीसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रोपांची वाढ जोमात सुरू झाली असून पाण्याची कमतरता पूर्णपणे दूर झाली आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तुर्तास मिटल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे नद्या-नाल्यांना आलेला पूर, वेगवान प्रवाह आणि धरण परिसरातील वाढती पर्यटकांची गर्दी लक्षात घेता कोणताही धोका पत्करू नये, नदीपात्रात किंवा धरणाच्या सांडव्याजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संततधार पाऊस कायम राहिल्यास काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.




