कोहोर | वार्ताहर | Kohor
निसर्गाचा खजिना लुटण्यासाठी पेठ तालुका सीमावर्ती भागाजवळ पर्यटकांना (Tourist) सध्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) केळावण परिसरात भिवतास धबधबा (Bhivtas Waterfall) खुणावत आहे. त्यामुळे या स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. नाशिक,दिंडोरी, पेठ, सुरगाणा तसेच गुजरात मधील सीमावर्ती भागातील पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत.
भिवतास धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे थेट सपाट जागेवरून खाली खोल दरीत पाणी (Water) पडत असल्याने उभे राहून समोरून गढुळ तर कधी पांढराशुभ्र फेसाळणारा धबधबा पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. सीमावर्ती तालुक्यातील (Taluka) परिसरात सध्या कधी उघडीप तर कधी जोरदार पाऊस सुरू असल्याने, लहान-मोठे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाले आहे. मात्र यात भिवतास धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलते आहे.
दरम्यान, या मुख्य धबधब्या बरोबरच सीमावर्ती भागात व तालुक्यातील छोटे-मोठे धबधबे देखील लक्ष वेधून घेत आहे. भिवतास धबधबा ८०० ते ९०० फुटावरून कोसळणारा मुख्य धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालत आहे. रम्य असा हा परिसर पर्यटकांना मोहून टाकत आहे. सध्या पावसाने (Rain) उघडीप दिल्याने सीमावर्ती भागातून भिवतासला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक शनिवारी-रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी करीत आहेत.




