Tuesday, November 19, 2024
Homeनाशिकअशीही भुजबळ नीती; जिल्हा परिषद राखली ताब्यात

अशीही भुजबळ नीती; जिल्हा परिषद राखली ताब्यात

नाशिक । प्रतिनिधी

अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार, अशी अवस्था होती. मात्र मोठ्या प्रयत्नाने भाजपशी जुळवून घ्यावे लागले होते. त्यावेळी बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी त्याची भर काढली. महाविकास आघाडीकडून छगन भुजबळ यांनी ‘भुजबळ नीती’चा वापर करून येवल्याला दोन सभापतिपदे मिळवून देत मित्रपक्ष काँग्रेसलाही एक सभापतिपद देत जिल्हा परिषदेचे सर्व सत्ताकेंद्र आपल्या हाती ठेवले आहेत.

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी आपली रणनीती आखत जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व सूत्र माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे दिले होते. समीर भुजबळ यांनी छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडणूक यशस्वीपणे हाताळल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना नेत्यांची धाव

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूत्र ठरले असताना वेळेवर शिवसेनेने ऐनवेळी तीन सभापतिपदांची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकच सभापतिपद देण्याची भूमिका घेतली. यानंतर एक्स्प्रेस इन हॉटेल येथे शिवसेना संपर्क नेते भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर प्रमुख नेते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड या नेत्यांमध्ये चार तास बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र निर्णय न झाल्याने समीर भुजबळ बैठकीतून बाहेर पडले.

त्यानंतर आज सकाळी समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना एक्स्प्रेस इनमधून भुजबळ फार्म येथे बोलावून घेतले. काँग्रेसचे सदस्यसुद्धा भुजबळ फार्म येथे आले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस भाजपला जाऊन मिळाले तर आपल्या हातातून पद निसटून जात असल्याचे कळताच शिवसेनेच्या नेत्यांनी भुजबळ फार्मकडे धाव घेऊन पुन्हा समीर भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा बैठक होऊन राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक समिती देण्याचे ठरले.

‘येवला फॅक्टर’ जपला

शिवसेनेकडून सभापतिपदासाठी रमेश बोरसे यांचे नाव निश्चित मानले जात असल्याने भुजबळांनी पुन्हा मुंबईमध्ये चक्र फिरवून दराडेंच्या पारड्यात आपले वजन टाकून ‘येवला फॅक्टर’ जपला. सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षविरोधी भूमिका घेत भाजपकडून निवडून आलेल्या त्यांच्या मुलीला सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला., मात्र भुजबळांनी ‘भुजबळ नीती’चा वापर करून सत्ता राखण्यात यश मिळवले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या