इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे (Rain) पाथर्डी-दाढेगाव रस्त्यावरील (Pathardi-Dadhegaon) वालदेवी नदीवरील (Waldevi River) धोकादायक बनलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत आहे. तरीही एक तरुण धाडस करून पाण्याच्या प्रवाहातून गाडीवर (Car) जाण्याचा प्रयत्न करत असताना थोडक्यात बचावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज बुधवारी (दि.९ जुलै) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या पुलावरून सोमनाथ पोपटराव आचारी हा धोकादायक बनलेल्या पुलाच्या (Brige) पुराच्या पाण्यातून दाढेगावकडे जात होता. यावेळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीवरून पडल्याने ते वाहू लागले. यावेळी वाहत जात असताना तात्काळ स्थानिक शेतकरी पप्पू बोराडे यांच्यासह राजेश कुमार, महेश पंत, निलू यादव, सतीश भोजने ,सलीम शेख, संदीप बोराडे यांनी त्याला तात्काळ मदत केल्याने सुखरूप बाहेर काढले .
तसेच सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच या पुलावरून शेतकऱ्यांच्या (Farmer) चार म्हशी व एक गाय असे पाच जनावरे वाहून गेली होती. धोकादायक बनलेल्या या पुलावरून स्थानिक शेतकरी व नागरिक ये-जा करत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, याआधीही वालदेवी नदीवरील या पुलावरून पुराच्या पाण्यात गेल्या तीन वर्षांमध्ये चार जणांचा पुरात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वालदेवी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाथर्डी व दाढेगाव या रस्त्यावर असलेल्या या धोकादायक पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. त्यामुळे शेतकर्यांसह कोणीही या पुलावर जाऊ नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पुलाचे बांधकाम करावे
दरवर्षी पावसाळ्यामध्ये वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाचा प्रश्न गंभीर बनतो. आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जनावरेही दगावली आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर दाढेगाव परिसरातील या धोकादायक पुलाचे काम आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावे.
(सोमनाथ बोराडे, अध्यक्ष, देवळाली विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस)




