नाशिक | Nashik
नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयासमोर (Tribal Development Commissionerate) दि.९ जूनपासून रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचे एजन्सीद्वारे नियुक्तीला विरोध व अन्य मागण्यांसाठी आंदोलन (Agitation) सुरु आहे. त्यांच्या या आंदोलनाची अद्यापही राज्य सरकारकडून (State Government) दखल घेण्यात आलेली नाही. या आंदोलनाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. त्यांना यावर तोडगा काढण्यास सांगितले होते.
पंरतु, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यानंतर दोन दिवसांपूर्वी या आंदोलकांनी (Protestors) आक्रमक पवित्रा घेत पोलीसांना न जुमानता थेट गेटवरुन उड्या घेत आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या ठिकाणी ठिय्या मांडत आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे या आंदोलकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यानंतर आज (गुरुवारी) या बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करत आयुक्तालयाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे या आंदोलकांनी सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढून पुन्हा एकदा आक्रमक होत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस हे आंदोलक आक्रमक होतांना दिसत असून, हे आंदोलन चिघळतांना बघायला मिळत आहे.
दरम्यान, या आंदोलकांनी दुपारच्या सुमारास आयुक्तालयाच्या समोर ठिय्या देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘इन्कलाब जिंदाबाद, हस सब एक है, यासह वेगवेळ्या घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर आता हे आंदोलक नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महाजन यावर तोडगा काढतात का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.





