नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे नाव सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एका मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपत्रात दाखल केल्याचे कळताच भाजपा युवा मोर्चा (BJP Yuva Morcha) नाशिकच्या वतीने आज काँग्रेस भवन समोर गांधी यांचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आरोपपत्रात सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याही नावाचा समावेश आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ साली एक याचिका (Petition) दाखल केली आणि या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा (Fraud) आरोप केला. सत्र न्यायालयाने आयकर विभागाला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि गांधी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची परवानगी दिली.
त्यानंतर हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे सोपवण्यात आले. यानंतर दि. ११ एप्रिल रोजी ईडीने ६६१ कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा नाशिक शहराध्यक्ष सागर शेलार यांनी दिली. त्यामुळे सरकार (Government) आणि न्यायव्यवस्थेने कारवाई करून अटक (Arrested) करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, यावेळी युवा मोर्चा नाशिक शहर सरचिटणीस प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, हर्षद जाधव, संदीप शिरोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यश बलकवडे, शहर उपाध्यक्ष पवन उगले, प्रवीण पाटील, गौरव घोलप, शहरातील मंडळ अध्यक्ष गौरव बोड़के, अक्षय गांगुर्डे, अविनाश पिंपरकर, उमेश मोहिते यांच्यासह आदी उपस्थित होते.