नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मागच्या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या (Suprme Court) आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा (Local Body Election) मार्ग खुला झाला. आता निवडणूक आयोगाकडूनही राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना करण्यात आल्याने नाशिक मनपा निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) इच्छुकांचे लक्ष प्रभाग रचना कशी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान शासनाकडून मनपा प्रशासनाला प्रभाग रचनेबाबत अद्याप आदेश मिळालेले नाही. आदेश आल्यावर काम सुरू होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून (Election Commission) प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नाशिक मनपासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द ठरण्याची शक्यता असून, चार सदस्यीय प्रभाग रचना होण्याची दाट शक्यता आहे. कारण यापूर्वी देखील २०१७ मध्ये मनपा निवडणूक चार सदस्यीय प्रभाग या पद्धतीने झाली होती. त्यावेळी राज्यात महायुतीचे सरकार होते.
ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) महाविकास आघाडी सरकार काळातील प्रभाग रचनेच्या वादामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. नाशिक मनपात देखील १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे गत महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगासह राज्य शासनाला निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकांची वाट मोकळी झाली आहे. तर आता आयोगाने देखील प्रभाग रचनांबाबत सूचना केल्याने लवकर निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे म्हणून आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभागरचना करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
नवीन प्रभागरचना, त्यांचे आरक्षण सोडत, हरकती व सूचना या सर्व कामांसाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रभाग रचनेबाबत सूचना केल्या असल्या तरी मनपाला याबाबत आदेश आलेले नाही. २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे १० टक्के लोकसंख्या बाढ गृहित धरून नाशिक मनपासाठी सदस्यसंख्या १२२ हून १३३ करण्यात आली होती. सद्यस्थितीत नाशिक मनपाकरिता १२२ सङ्ख्य संख्या असून, ३१ प्रभाग आहेत. १३३ नगरसेवकांचा फॉर्म्युला निश्चित केल्यास मनपाला नव्याने प्रभाग रचना करावी लागेल.
दरम्यान, २०१७ साली नाशिक मनपात एकूण सदस्यसंख्या १२२ होती. तर एकूण प्रभाग ३१ होते. त्यात भाजप ६६, शिवसेना ३५, मनसे ५. काँग्रेस ६, अपक्ष ३, आरपीआय (आठवले गट) याप्रमाणे पक्षीय बलाबल होते. आता मात्र त्यात बदल होणार असून शिक्सेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन गट पडले आहे. दोघांचे एक गट सत्तेत महायुतीत तर एक गट विरोधात म्हणजे महाविकास आघाडीत आहे. तरी महायुती व महाविकास आघाडी असा सामना होतो की, सर्व पक्ष स्वबळावर मैदानात येता, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.