नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दसरा व विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. २०) रामकुंड गंगाघाट मैदानावर होणारा रावण दहन कार्यक्रम आणि देवी मूर्ती विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतुकीत बदल (Nashik Trafic Change) करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
रामकुंड (Ramkund) गंगाघाट मैदानावरील रावण दहनापूर्वी चतुः संप्रदाय आखाड्यापासून श्रीराम व लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघेल. ही मिरवणूक मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोड, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिर मार्गे रामकुंड गंगाघाट पार्किंग मैदानात पोहोचेल. तिथे रामलिला व त्यानंतर रावण दहन होणार असून या सोहळ्यासाठी सुमारे ९ ते १० हजार भाविक भक्तांचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
तसेच, शहरातील विविध नवरात्र मंडळे व ओझरची देवी विसर्जनासाठी रामकुंडवर येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिसूचनेनुसार पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल आणि या परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना हे प्रतिबंध लागू असणार नाहीत. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी (Police) दिला आहे.
प्रवेश बंद मार्ग
मंगळवारी रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत
मालेगाव स्टँडकडून रामकुंड सरदार चौक ते गाडगे महाराज पूल.
गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक, रामकुंड ते मालेगाव स्टँडला जाणारे व येणारे मार्ग.
पर्यायी मार्ग
वाहनचालकांनी मालेगाव स्टँडकडून पंचवटी कारंजा, निमाणी बस स्टँड, काठ्या मारुती चौक, गणेशवाडी मार्गे ये-जा करावी.
नागरिकांनी गर्दीचे ठिकाणे टाळून इतर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




