मुंबई | Mumbai
नाशिकच्या तपोवनामध्ये (Nashik Tapovan) सुमारे १,८०० हून अधिक वृक्षांच्या नियोजित कत्तलीविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. यात नाशिकच्या कलाकारांसह पर्यावरणप्रेमी, सामजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शविला आहे. वृक्षतोडीवरून प्रशासनासह मंत्री आणि नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, साधरणपणे वृक्षतोड (Tree Cuting) टाळली पाहिजे याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. फक्त या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जात आहे. ते राजकीयकरण करणे चुकीचे आहे. साधुग्रामची ही जागा असून,कित्येक वर्षापासून आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करत आहोत. आपण जर २०१५ आणि २०१६ ची गुगल इमेज बघितली तर त्या ठिकाणी कोणतीही झाडे नाहीत, २०१७-१८ ला महानगर पालिकेने एक प्रस्ताव घेतला. अतिक्रमण होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपण केले पाहिजे, असा तो प्रस्ताव होता. आपलीही ५० कोटी वृक्षाची योजना सुरू होती. त्या अंतर्गत विचार न करता म्हणजे मी हे चूक आहे असं म्हणणार नाही, तिथे वृक्षारोपण केले आहे, म्हणून साहजिकच लोकांना वाटतंय आता ही झाडे का तोडता. पण महत्त्वाची अडचण ती वृक्ष तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचे ही अडचण आहे, अस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, प्रयागराजचा जो कुंभमेळा (Kumbhmela) होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो आणि आपल्याला ३५० एकरमध्ये करायचा आहे. तिथली जमीन जर मिळाली नाही तर कुंभमेळा कसा होईल, कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे, सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण यांना एक विशेष महत्व दिलेले आहे. नदीला एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत. एक प्रकारे कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता हा समजही लोकांचा बरोबर आहे, त्यामुळे यातला मधला मार्ग काढावा लागणार आहे. जागा पण वापरता येईल पण जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढी वाचवता येतील. काही वृक्ष ट्रान्सप्लांट केली पाहिजे. मी प्रशासनाशी चर्चा केली, त्यांचही तेच मत आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




