नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) होणारा सिंहस्थ हा केवळ धार्मिक नव्हे तर संत परंपरेने चालवला जाणारा अध्यात्मिक उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून (Central Government) स्थायी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. भविष्यात नाशिक पर्यटनाचे स्थान होईल. सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील ४४ कामांच्या एकूण ५,६५७ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिंहस्थाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यंदाचा सिंहस्थ हा विशेष आहे कारण ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आला आहे. गुरु सिंह राशीत येणार आणि वक्री होणार व पुन्हा येणार असा योग असल्याने कुंभाचे पर्व २८ महिने चालणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ पर्यंत यावेळचा कुंभ चालणार आहे. सुमारे ४० ते ४२ विविध पर्व स्नान आणि महत्वाचे अमृत स्नान या सिंहस्थात होणार आहे. यातील पहिले अमृत स्नान ०२ ऑगस्ट २०२७ रोजी होईल. यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला या कुंभाने भारतात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर जागरणाची जी एक मोहीम चालली आहे त्याचे प्रत्यंतर या सिंहस्थासात पाहायला मिळाले आणि जगातील आस्थेचा सर्वात मोठा महाकुंभ त्याठिकाणी झालेला बघायला मिळाला”, असे त्यांनी म्हटले
पुढे ते म्हणाले, “देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्याठिकाणी गेले आणि गंगेमध्ये स्नान केले. याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो. मोठ्या प्रमाणात या कुंभामध्ये स्नान करण्यासाठी भाविक येतात. प्रयागराज आणि नाशिकमधील (Nashik) सिंहस्थात एवढाच फरक आहे की प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याठिकाणी गंगातिरी १५ हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे जो कुंभ होता त्यासाठी एकतरी ५०० हेक्टर जागा आहे. त्यामुळे अतिशय कमी जागेत हे सर्व व्यवस्थापन याठिकाणी कराव लागते. २०१५ साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्यवस्थापन आपण करू शकलो. कुठलीही दुर्घटना न घडता त्यावेळी हा सिंहस्थ पार पाडला. मात्र यावेळी त्याच्यापेक्षाही मोठे आव्हान असून, याठिकाणी प्रयागराजपेक्षा पाच पट अधिक भाविक येतील असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था, सुरक्षा, पर्व स्नान, अमृत स्नान योग्यप्रकारे झाले पाहिजे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारची विविध विकासकामे हाती घेतली आहेत”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच “केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून नाशिकमध्ये जवळपास २० हजार पेक्षा अधिक कोटी रुपयांचे कामे हाती घेतली आहेत. संपता संपता नाशिकमधील ही विकासकामे २५ हजार कोटीपर्यंत जातील. यातील २० हजार कोटींची कामे मंजूर केली असून, त्यातील ६ हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आज केलेले आहे. मला या निमित्ताने सर्व प्रशासकीय अधिकार्यांचे अभिनंदन करायचे आहे. या सगळ्यांनी अत्यंत समन्वयाने काम केले आहे. कुंभासाठी नाशिक आणि त्र्यंबकच्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे. हा सिंहस्थ नाशिक आणि त्र्यंबकचे नाव जगभरात घेऊन जातो. त्यामुळे यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. चांगले घाट, गोदावरी स्वच्छ करत आहोत, मंदिरांच्या पुनरनिर्माणाचे काम सुरु असून, यामध्ये त्याची पारंपारिक दृश्य कायम राहावे याकडे लक्ष देत आहोत”, असेही फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले, “नाशिक अशी नागरी आहे ज्याठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीतामाई यांचे वास्तव्य अनेक काळ राहिले आहे. याबरोबरच अंजनेरी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग,गोदेमाईचा उगम हे महत्वाचे क्षेत्र आहे. याठिकाणची कामे पुढील २५ वर्ष लोकांच्या कामी आली पाहिजे असे आमचे नियोजन आहे.यामुळे भविष्यात नाशिकला फायदा होणार असून कनेक्टीव्हीटी तयार होईल. रेल्वेचे काम, बस स्थानकाचे काम, सीसीटीव्ही लावण्याचे काम करत असून, एक आधुनिक प्रकारचे नाशिक तयार करणार आहोत. साधुग्रामसाठी १२०० एकर जागा अधिग्रहण करत असून, यामुळे लोकांना त्रास होणार आहे. परंतु, त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करणार आहोत. सिंहस्थाची सर्व कामे पारदर्शी होतील, कोणालाही फेव्हर होणार नाही. कोणाला अडचण होऊ देणार नाही. टेंडरमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, ती कामे अधिकाऱ्यांवर सोडा. काम चांगले करायचे असतील तर चांगले ठेकेदार लागतील. आम्ही माणूस असून, कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू”, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.




