त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे दिला.तसेच महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे यांची राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. राज्यात महायुतील स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात भाजपला १३२, शिंदेंच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला आहे.
महायुतीत भाजपला (BJP) सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने देखील मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीत दोघांमध्ये रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विविध ठिकाणी पूजा-अर्चा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांनी त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात जाऊन पूजा करत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे,असे साकडे महादेवाला घातले.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास लता शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद (CM Post) मिळावे यासाठी महादेवाला साकडे घातले. यावेळी त्यांनी पुरोहितांकडून अभिषेक करत त्र्यंबकराजाकडे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली. याप्रसंगी अध्यात्मिक क्षेत्रातील बापू सोनवणे,आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा