नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी आज (दि. १४) शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शहर विकास आराखड्यात प्रस्तावित तसेच मनपाने आरक्षित केलेल्या विविध वाहनतळांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी शहर विकासाच्या दृष्टीने पार्किंग व्यवस्थेत सुधारणा महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
अनधिकृत पार्किंगला (Parking ) पर्याय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मनपाच्या प्रस्तावित ३३ वाहनतळांपैकी कॅनडा कॉर्नर येथील अघोरा पार्क, मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलचे वाहनतळ व पंचवटी येथील रिध्दी सिध्दी अपार्टमेंटचे बाहतळ आदिंची पाहणी केली. या वाहनतळांचा विकास खासगी विकसकांद्वारे करण्यात आला आहे.
या जागांच्या वाहनतळांच्या प्रत्यक्ष स्थितीची त्यांनी पहाणी केली. तसेच महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील वाहनतळ, महात्मा फुले कलादालन, शालिमार परिसर, गाडगे महाराज पुलाजवळील प्रस्तावित वाहनतळ, रामकुंड परिसर, सिता गुंफा परिसर, सिटी सेंटर मॉल,गंगापूर रोड येथील बाहनतळ आदी ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी केली.
दरम्यान, यावेळी त्यांनी आगामी सिंहस्थ महापर्व आणि शहरात वाढत चाललेल्या पार्किंग समस्येच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. पाहणी दौ-यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवी बागुल आणि इतर अधिकारी उपस्थित होते.