नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik
शिलापूरमध्ये (Shilapur) उभारलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या टेस्टिंग लॅबचे (Testing lab) काम पूर्णत्वाकडे आहे, अशा बातम्या गेल्या डिसेंबरपासून नाशिककर ऐकत आहेत. अजूनही ते पूर्णत्वाकडेच वाटचाल करत आहे. ते कधी पूर्णत्वास येईल हे ज्योतिषालाही सांगता येत नाही. २०१५ पासून लॅबच्या कामाची सुरुवात झाली. पुढील वर्षी त्याला दहा वर्षे पूर्ण होतील.
सप्टेंबर २०२३ मध्ये तत्कालीन खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत लॅबचा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग (R.K Singh) यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असल्याचे सांगितले होते. मात्र वर्ष झाले, काम सुरूच आहे. सध्या इलेक्ट्रिक उत्पादनांचा दर्जा तपासण्यासाठी बंगळुरू, भोपाळ येथे जावे लागते, वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात होतो. नव्या प्रयोगशाळेमुळे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड इत्यादी राज्यांतील इलेक्ट्रिक उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब प्रकल्पातील प्रयोगशाळेचे काम पूर्णत्वाकडे असून, सर्व काम ऑनलाईन असेल.
गोडसे यांनी पाहणी केली तेव्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले,शिलापूरचे सरपंच पवन कहांडळ, माजी सरपंच रमेश कहांडळ, सय्यद पिंप्रीचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, विंचूर गवळीचे सरपंच विजय रिकामे, शिलापूर सोसायटीचे चेअरमन गणेश कहांडळ आदी उपस्थित होते.शिलापूर शिवारात १०० एकर जागेत उभारलेली राज्यातील पहिली त्तर देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही इलेक्ट्रिकल लॅब आहे. हे काम करोनामुळे मंदावले होते. नंतर वेगाने सुरू झाले. आता अवजड वाहनांसाठी रस्ता नसल्याने रखडले आहे.
दरम्यान, रस्त्यासाठी (Road) जमीन संपादन व काम सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयात पडला आहे. कधी आचारसंहिता तर कधी निवडणुका यामुळे त्यावर काम झाले नाही. एवढा मोठा शंभर कोटींचा प्रकल्प आता फक्त रस्त्याअभावी रखडला आहे. आता नव्या खासदारांनी तरी नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, जनतेची अपेक्षा आहे.
शिलापूरचा चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प
माजी खासदार समीर भुजबळ यांनी तो प्रकल्प नाशिकला आणला. त्यानंतर त्यावर कळस चढवण्याचे काम तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी निश्चित केले. मात्र दोन वर्षे करोना, त्यानंतर महाविकास आघाडीत असल्याने गती मंदावली. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर गावठाणाची शंभर एकर जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. एचएएल, सिक्युरिटी प्रेस यानंतर प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारचा येणारा हा प्रकल्प असल्याने तो नाशिकच्या (Nashik) उद्योगांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिलापूरचा चेहरामोहरा बदलण्यास मदतच होणार आहे. हजारो तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प व्हावा, अशी अनेक वर्षांची येथील इलेक्ट्रिकल उत्पादकांची इच्छा आहे.