नाशिक | प्रतिनिधी |Nashik
कांद्याच्या प्रश्नावर (Onion Issue) जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज (बुधवारी) भर पावसात नाफेडवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नाफेडच्या अधिकाऱ्यांना (NAFED Officer) कांद्याच्या माळा घालून निवेदन देण्यात आले. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. नाफेडने शेतकर्यांऐवजी (Farmer) व्यापार्यांकडून व व्यापार्यांनी जो कांदा साठवला होता, त्या कांद्याची परस्पर खरेदी केली. या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने आजपासून रणशिंग फुंकले असून आता रस्त्यावरची ही लढाई कांदा उत्पादक शेतकर्यांना न्यााय मिळवुन दिल्या शिवाय शांत बसणार नाही.असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
जिल्हा व शहर काँग्रेसच्या (Congress) वतीने बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) दुपारी कांदा बटाटा भवनापासुन नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर सभा झाली, त्यावेळी बोलतांना थोरात यांनी वरील इशारा दिला. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, विश्वास उटगी, मोहन तिवारी, गजानन देसाई, जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव रमेश काहंडोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, सुमित्रा बहिरम व्यासपीठावर उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असतांना प्रत्येकवेळी शेतकर्यांना मदतीचा हात दिला. मात्र आता महायुतीच्या राज्यात धर्माच्या नावावर मते मागणे व धनदांडग्यांचे हित जोपासने सुरु आहे. कृषीमंत्रीपद वादात सापडत असल्याने कृषीमंत्री होण्यासही धाडस होत नाही. नाफेड व एनसीसीएफ मधील घोटाळा हा सत्ताधारी प्रणित आहे. बरेच अधिकारी त्यात अडकले आहे. भ्रष्टाचाराचे माठे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी काँग्रेसने आता एल्गार पुकारला आहे. येत्या २० ऑगस्टला चांदवडला मोठे आंदोलन (Agitation) होणार असून, देशभर हा वणवा पेटणार आहे. जो पर्यंत भ्रष्ट्राचाराची चौकशी होत नाही, शेतकर्यांना दिलासा मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन शांत होणार नाही”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे,सचिन होळकर, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, खा, शोभा बच्छाव यांचे भाषण झाले. त्यांनीही नाफेडच्या कारभारावर तोंडसुख घेतले. तर ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी थोरात यांचे भाषण सुरु असतानाच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे उपस्थितांनी अडोसा शोधत भाषण ऐकले. त्यानंतर पावसातच नाफेड कार्यालयावर मोर्चा गेला. यावेळी नाफेडचे अधिकारी आर. एम. पटनायक व श्रीवास्तव यांना मोर्चा समोर बोलवून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकर्यांनी कांद्याचा माळा गळ्यात घातल्या होत्या. तशाच माळा पुन्हा ना़फेड व्यवस्थापकांच्याही गळ्यात घालून निवेदन देण्यात आले.
निवेदनात काय म्हटलंय?
महाराष्ट्रात (Maharashtra) व प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून आज मातीमोल भावाने शेतकर्यांना आपला कांदा विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे. यात भ्रष्टाचार दिसत आहे. कांद्याला किमान उत्पादन खर्चाच्या आधारावर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला पाहिजे. जिल्ह्यात व महाराष्ट्रात खुला लिलाव पद्धतीने कांद्याची खरेदी झाली पाहिजे, सध्या नाफेड शिवार खरेदी करत आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांऐवजी व्यापारी लोकांचाच कांदा खरेदी केला आहे. शेतकर्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकर्यांवर फार मोठा अन्याय होत आहे. नाफेडने शेतकर्याऐवजी व्यापाऱ्यांकडून व व्यापाऱ्यांनी जो कांदा साठवलेला आहे, त्या कांद्याची नाफेड परस्पर खरेदी करत आहे. याची चौकशी झाली पाहिजे, यासह आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.




