नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयटक संलग्न संघटनांच्या महासंघाच्या अंतर्गत दिल्ली (Delhi) येथील जंतरमंतर येथे नाशिकच्या (Nashik) बांधकाम कामगारांनी (Construction Workers) भव्य धरणे आंदोलन (Agitation) केले. जिल्ह्यातील बांधकाम कामगार व संघटना पदाधिकार्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. कामगार आणि रोजगार मंत्री के सुब्बाराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यसभा खासदार के.संदोष कुमार, आयटक राष्ट्रीय सचिव वहिदा निजाम आणि रामकृष्ण पांडा यांनी मोर्चेकर्यांना संबोधित केले.
यावेळी केंद्रीय कामगार संघटना (Central Trade Union) आणि स्वतंत्र क्षेत्रीय महासंघ आणि संघटनांच्या मंचाने पुकारलेल्या २० मे २०२५ रोजीच्या राष्ट्रीय सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकचे भिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील अनिल पठारे, कैलास मंजुळे, भिमा मेंगाळ, सुकदेव जोंधळे यांच्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील एकूण १५० हून अधिक कामगार राज्याध्यक्ष कॉम्रेड विजय बचाटे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार आयटक (AITUC) संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा, बांधकाम कामगाराला दरमहा सहा हजार रुपये पेन्शन यावी, देशभरात बांधकाम कामगार कल्याणकारी योजना एकसमान असावी, सर्व बांधकाम कामगारांना आरोग्याची इ.एस.आय.सी. योजना लागू करण्यात यावी. दरवर्षी सणासाठी बांधकाम कामगार अधिनियम २८१-अ नुसार कामगारांना दहा हजार रुपये सन्मानधन वितरित करण्यात यावे, यासह आदी मागण्या करण्यात आल्या.