पंचवटी | मनोज निकम | Panchvati
गोदावरी नदीचे (Godavari River) पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, भाविक (Devottes) अजाणतेपणी ते अमृत समजून पिऊ लागले आहेत. विविध राज्यातून भाविक नाशिकच्या पवित्र रामकुंडात (Ramkund) स्नान करण्यासाठी येत असतात आणि तेथील अमृत समजून पाणी श्रद्धेने सेवन करतात. मात्र, हेच पाणी आता दूषित झाले असून, दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे भाविकांचे आरोग्य लक्षात घेता गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गोदावरी नदीत अनेक ठिकाणी सांडपाणी आणि औद्योगिक केमिकल, कचरा मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. नाशिकच्या महानगरपालिकेकडून याबाबतचे पूर्वनियोजन नसल्याने नाशिक शहरातून वाहणारे गटारांचे सांडपाणी आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य थेट नदीत टाकले जाते. परिणामी यामुळे पाण्याचा रंग बदलत असून दुर्गंधीही पसरू लागली आहे. गोदावरी नदीचे पाणी भाविकांकडून श्रद्धेने सेवन केले जाते, पण धोका मोठा असल्याचा दावा जलतज्ज्ञ व्यक्त करीत आहे. पवित्र गोदावरी नदीला गंगा गोदावरीचे रूप मानतात. रामकुंड येथे येणारे अनेक भाविक हे पाणी पवित्र मानून प्राशन करतात. धार्मिक ग्रंथांमध्ये गोदावरीचे पाणी (Water) अमृततुल्य असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे अनेकजण नदीचे पाणी पिण्यास मागे पुढे पाहत नाहीत. मात्र, हे पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. नदीचे वाढते प्रदूषण पाहता महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नदीतील सांडपाणी रोखणे, कचरा व्यवस्थापन करण्याची गरज आहे. तसेच मनपाकडून दूषित पाणी न पिण्याबाबत जागरूक करण्याचे फलक लावण्यात आले असून देखील याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. येथे येणाऱ्या परराज्यातील भाविकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. नदीचे पाणी अमृत समजून न पिणे, स्नानानंतर स्वच्छ पाणी वापरणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, नदीत कचरा आणि सांडपाणी टाकू नये, गोदावरी ही के वळ एक नदी नसून, ती नाशिककरांची जीवनरेखा आहे. त्यामुळे तिचे स्वच्छता व पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे.
भाविक काय म्हणाले?
रामतीर्थावर स्नान करण्यासाठी अवघ्या जगभरातून भाविक येत असतात. प्रदूषित पाण्यात स्नान केल्यानंतर याच भक्त, भाविकांना व्हायरल इन्फेक्शन, त्वचेचे आजार जडतात. मंगळवारी (दि.१४) रामतीर्थवर स्नानासाठी भक्त भाविकांची एकच गर्दी झाली होती. यातील उत्तराखंड येथून तीर्थस्नानासाठी आलेल्या भाविकाला व्हायरल इन्फेक्शन झाले. त्यामुळे त्यांनी एक खासगी रुग्णालय गाठत उपचार घेतले. या रामतीर्थावर पुन्हा कधीच येणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
उपनद्यांना नाल्यांचे स्वरूप
रामशेजकडून येणारी अरुणा नदी सद्यस्थितीत लुप्त पावलेली दिसून येत आहे. वरुणा नदीचे उगमस्थान दिंडोरी तालुक्यातील मानुरी शिवारात आहे. म्हसरूळ गाव मार्ग, निसर्गनगर, संजयनगर, गणेशवाडी मार्गे ती गाडगे महाराज पुलाजवळ संगम होतो. मात्र, याच वरूणा नदीला वाघाडी नाला म्हणून संबोधले जात आहे. कपिला नदीचा उगम हा आडगाव शिवारातून प्रमोद महाजन गार्डन, साईनगर, अंबाजी नगर, महामार्ग, कॉलेज पाठीमागून प्रगती गॅरेज, जनार्दन स्वामी मठाजवळून तपोवनात जाऊन मिळते. मात्र, उगम स्थानापासून तपोवनत येऊन मिळेपर्यंत या मार्गावर ठिकठिकाणी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
भक्त, भाविक म्हणतात….
- रामतीर्थातील पाणी स्वच्छ असावे.
- नदीपात्रात येऊन मिळणारे नाले बंदिस्त करावे.
- अत्याधुनिक एसटीपी प्लांट सुरू करावे
- नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- नाल्यांचे सर्वेक्षण व्हावे.
- अरुणा, वरूणा, कपिला या तीनही उपनद्या स्वच्छ कराव्या.
- या उपनद्यांना जोडले गेलेल्या गटारी वेगळ्या मार्गस्थ कराव्या.
- धार्मिक पावित्र्य टिकून राहण्याकरता प्रशासनाने पावले उचलावी.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून अवघ्या जगभरात नाशिकची ओळख आहे. भक्त, भाविक देशभरातून येत असतात. नाशिक महानगरपालिकेने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करावी. तसेच सद्यस्थितीत भक्त, भाविकांच्या भावनांशी सुरु असलेला खेळ प्रशासनाने त्वरित थांबवावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्टाईलने आंदोलन करू.
गौरव गोवर्धने, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, रायुकाँ