संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय. पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न…
सुट्टीमुळे सध्या दररोज एखाद्या मैत्रिणींला फोन केला जातो नाहीतर कुणाचा तरी फोन येतो. त्यामुळे थोडे का होईना इतरांशी कनेक्ट राहता येते. प्रत्यक्ष भेट दुरापास्त झालेली असताना या आभासी साधनांचाच आपल्याला आधार आहे. असच एका मैत्रिणीशी बोलत असताना, सहज विचारलं “काय आता अहो घरीच असतील ना? मज्जा आहे तुझी.”
तेव्हा तिचे उत्तर ,”कसलं काय ग? बँकेला कसली सुट्टी? जावंच लागत त्यांना.” तेव्हा लक्षात आलं की या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात फक्त डॉक्टर, पोलीसच लढतायेत असं नाही तर अजूनही अनेक लोक आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे आपले बँक कर्मचारी.
या जागतिक संकटामुळे आपल्या लक्षात आलंय की पैसा हे सर्वस्व नाहीये, संकट आलं की साचवलेल्या पैशा पेक्षा माणुसकीच कामाला येते, हे जरी कितीही खरं असलं तरी, पैशाशिवाय गत्यंतर नाही हे देखील आपल्याला माहीत आहे. पैशाने सर्वकाही विकत घेता येत नाही हे खरंच पण पैसा असेल तर बऱ्याच गोष्टी सुसह्य होतात हे ही खोटे नाही.
हीच अर्थव्यवस्थेची बाजू भक्कम पणे सांभाळणारे आपले बँकिंग क्षेत्र, आणि बँक कर्मचारी हे आजच्या या परिस्थितीत आपल्यासाठी खरेखुरे अर्थदूत ठरलेत.
ऑनलाइन बँकिंग मुळे आता बऱ्याच जणांचं बँकेत जाणं कमी झालंय पण तरीही ऑनलाइन व्यवहार चालतात ते या बँक कर्मचाऱ्यांच्याच भरवशावर. आजही अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्यक्ष बँकेत जाणेच पसंत करतात. तसेच आर्थिक दुर्बल घटक देखील बँकेच्या प्रत्यक्ष भेटीवरच अवलंबून असतात. आणि त्यांनाच या बँकिंग सेवेची आज जास्त गरज आहे त्यामुळेच बँकिंग सेवा ही सुद्धा अत्यावश्यक सेवा ठरली आहे. आणि ते देखील न कंटाळता सेवा देतायत.
मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर लाखो जनधन खाती उघडली आहेत आणि या खात्यांवर सरकारने प्रत्येकी 500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला आहे, गरीब बेरोजगार लोकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे पण ते पैसे या गरजू लोकांपर्यंत पोचवणारे आहेत आपले अर्थदूत.
एक महिना उलटलाय लॉकडाऊन होऊन. या काळात असंख्य कर्मचाऱ्यांचे पगार, असंख्य सेवनिवृतांची पेंशन त्यांना मिळवून देणारे आहेत हेच अर्थदूत. काही ठिकाणी तर लॉक डाउन मुळे जे ज्येष्ठ बँकेपर्यंत जाऊ शकले नाहीत त्यांना त्यांचे सेवा वेतन यांनी घरपोच सुद्धा नेऊन दिलंय. सगळं बंद झालं असल तरी ATM मधून आपण अजूनही पैसे काढू शकतोय, ही सुद्धा यांचीच किमया. विचार करा जर अशा परिस्थितीत बँका सुद्धा बंद असत्या या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सुट्ट्या घेतल्या असत्या तर आपलेच हक्काचे पैसे सुद्धा आपल्या कामी आले नसते.
मार्च महिना म्हणजे आधीच आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना, आधीच त्यांच्यावर कामाचा लोड असतो अशातच ही आणखी नवी जबादारी त्यांच्यावर आली आहे ते ती मनापासून पार पाडतायेत, म्हणूनच त्याची सेवा सुद्धा या आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यंत महत्वपूर्ण आहे.
करोनाच्या आजाराचे कधी उच्चाटन होईल त्याचे नंतर काय परिणाम होतील हे अजून अज्ञात आहे पण या सगळ्यांचे आर्थिक परिणाम मात्र अत्यंत भयावह असतील हे नक्की आहे. हा धोका लक्षात घेऊन आजच अनेक अर्थकर्मी कामाला लागले आहेत. होणाऱ्या परिणामांचा आधीच अंदाज घेऊन करायला लागणाऱ्या उपाय योजनांची चाचपणी चालू आहे.
मला वाटत प्रत्यक्ष संकटाशी लढण्या इतकेच हे नंतरचे नियोजन अत्यंत अत्यावश्यक आहे. कारण एखाद्या कार्यक्रमात सगळेजण झटून कामे करतात पण त्यानंतर मात्र सगळे थकून झोपल्यावर नंतरची आवरा आवर करण्याचे काम मात्र आईकडेच असते, आणि खर्चाचा भार असतो बापाच्या डोक्यावर.
तसंच हे संकट टळल्यावर होणारे नुकसान भरून काढण्याचे काम या आपल्या या अर्थदूतांवरच आहे. त्यासाठी ते नक्कीच आपलं सर्व ज्ञान नक्कीच पणाला लावतील यात अजिबात शंका नाही.
म्हणूनच म्हणावेसे वाटते,
या अभूतपूर्व अशा संकटात अर्थपूर्ण अशी सेवा देणाऱ्या या देवदूताना अर्थात अर्थदूताना आमचा मानाचा मुजरा,
सर्व जग प्रचंड आर्थिक खाईत लोटले जात असताना निरंतर सेवा बजावणाऱ्या या मित्रांना मनःपूर्वक सलाम !!
सलाम तुमच्या बुद्धीला !!
सलाम तुमच्या ज्ञानाला!!
सलाम तुमच्या सेवेला!!
तनुजा सुरेश मुळे/ मानकर नाशिक (लेखिका ब्लॉगर आहेत)