नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यात (Niphad Taluka) जसे द्राक्ष, कांदा, बेदाणा, टोमॅटो प्रसिद्ध आहे, तसेच महाशिवरात्र उत्सव काळात अनेक वर्षापासून उपवासाचे मुख्य पक्वान्न असलेल्या होलसेल साबुदाणा (Sago) विक्रीच्या माध्यमातून निफाड शहर (Niphad City) हे नावारूपाला आले असल्याने यावर्षी निफाड शहरात जवळपास १२ ते १५ हजार साबुदाणा कट्टयांची विक्री होवून कोट्यावधी रुपयांची उलाढाल साबुदाणा विक्रीच्या माध्यमातून झाली.
तालुकाभरातून नव्हे तर राज्यभरातून वर्षभर पुरेल इतका साबुदाणा खरेदीसाठी नागरिक निफाड येथे येत असल्याने महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) निफाड शहरात साबुदाणा विक्री ही गत एक महिन्यापासून सुरू असल्याचे निफाड शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी कांतीलाल भेरूलाल चोरडिया फर्म मालक पवन चोरडिया यांनी दैनिक देशदूतशी बोलताना सांगितले. असा किरकोळ साबुदाणा ७० ते ८० रुपये किलो या दराने वर्षभर मिळत असतो. परंतु निफाड शहरात महाशिवरात्रीच्या पर्वकालावर निफाड येथील सर्वच होलसेल, घाऊक व किरकोळ विक्रेते हे अनेक वर्षापासून नागरिकांना होलसेल दरात साबुदाणा गोण्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने होलसेल दराने देतात.
यात दर्जेदार कंपनी असलेल्या डॉल्फिन एम.एस, लक्ष्मी, डबल हत्ती अशा विविध कंपन्यांचे साबुदाणा तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ येथून हे व्यापारी चारचाकी, सहाचाकी वाहनातून बोलावत असतात व १४०० ते १५०० रुपये या दरम्यान २५ किलो, ३० किलो पॅकमध्ये साबुदाणा गोण्या उपलब्ध करून देत असतात. यात नागरिकांचे जवळपास एका किलोमागे २० ते २५ रुपयांचा फायदा होत असल्याने वर्षभर पुरेल इतक्या आर्थिक कुवतीनुसार नागरिक साबुदाणा आपल्यासाठी आपल्या पाहुणे मंडळींसाठी खरेदी करीत असतात. परंतु यावर्षी पाहिजे त्या प्रमाणावर नागरिकांचा उत्साह दिसून आला नसल्याचे अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ही बाब लक्षात आली. यामागे कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याचेही बाब समोर आली असून कांदा तेजीत राहिला तर बाजारपेठ उजळून निघतात, असे पवन चोरडिया यांनी सांगितले.