त्रंबकेश्वर | प्रतिनिधी
सोमवारी (दि. २१) रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये स्वामी समर्थ कमानीजवळ एक साधु मृतावस्थेत आढळून आला. या व्यक्तीचे नाव प्रभाकर सदाशिव घोटे (वय ५२) रा. पिंपळगाव डुकरा ता. इगतपुरी असे असून हा साधु फिरस्ती होता. या साधुची त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मृत्यूची माहिती देण्यात आली असता त्याची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदर साधुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती, महंत जयदेव गिरी व अन्य साधुंनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असून या बाबत पोलिसांकडून कायदेशीर तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या साधुची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केला असून त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी देखील महंतांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा