नाशिक | प्रतिनीधी
आग्रा रोडवरील रासबिहारी स्कूलजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिचा दुचाकीचालक पती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रांती धनंजय पाटील (वय ४५, रा. गजानन निवास, आकाश पेट्रोल पंपामागे, दिंडोरीरोड, पंचवटी) असे मृत महिलेचे नाव आहे. धनंजय विनायक पाटील हे पत्नी क्रांतीला दुचाकीवर बसवून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता रासबिहारी लिंकरोड मार्गे दुचाकीहून जात होते. दोघेही प्रमोद महाजन गार्डनजवळून जात असताना, पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकच्या चालकाने दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करुन पाटील यांच्या दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात भरधाव आयशरच्या पुढील चाकाखाली सापडून क्रांती पाटील जागीच ठार झाल्या. तर धनंजय हे जखमी झाले.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.
तर, दुसरी घटना शनिवारी सातपूर येथील महिंद्रा सर्कल येथे घडली. पतीसमवेत दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. सुमीता किरण राजगुरू (४५, रा. राज्य कर्मचारी वसाहत, शिवाजीनगर, सातपूर) या पती किरण यांच्यासमवेत दुचाकीने नाशिकच्या दिशेने येत असताना, सकाळी ११.३० च्या सुमारास अंबिका स्वीट, महिंद्रा सर्कल येथे आयशर ट्रक (एमएच १४, केए ४८८५) चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या, तर किरण राजगुरू हे जखमी झाले. ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चुकीची सिग्नल व्यवस्था
अंबिका स्वीट येथे बसविण्यात आलेली सिग्नल व्यवस्था चुकीची आहे. दोन सर्कलमुळे याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात. त्यामुळे नियमांचे पालन होत नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या अवजड वाहनांमुळेही प्रचंड कोंडी होते. त्यामुळे रस्ता रुंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा