पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik Agricultural Produce Market Committee) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बाजार समितीचे १५ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची (Collector) आज (सोमवारी) भेट घेतली. बाजार समितीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालकांनी हा निर्णय घेतला असल्याचे संचालकांनी सांगितले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल (Agricultural Goods) विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाही. विद्यमान सभापतींकडून मनमानी व अनागोंदी कारभाराला बाजार समितीतील व्यापारी वैतागले आहेत. सभापतींकडून संचालकांना दमदाटी केली जाते, बाजार समितीच्या होणाऱ्या सभांचे प्रोसिडिंग दिले जात नाही.
तसेच बाजार समितीचे सभापतींवर भ्रष्टाचाराचे आरोप संचालकांनी केले आहेत. या कारणास्तव शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वात अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. तसेच या ठरावाबाबत ११ मार्च रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे यावेळी काय निर्णय होईल याची प्रतीक्षा राहील. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, यापूर्वी अनेक वेळा नाशिकच्या बाजार समितीच्या राजकारणात चुंभळे विरुद्ध पिंगळे असा सामना पाहायला मिळाला होता. पिंगळे व चुंभळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांना भाजपचे (BJP) शिवाजी चुंभळे यांनी विरोध दर्शवला आहे.