नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा प्रशासनाने (District Administration) यंदाही पाणीपुरवठ्यासाठी टंचाई आराखडा जाहीर केला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला (Tankers) कमी मागणी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असले तरी गतवर्षाच्या टंचाईचा अंदाज घेत यंदा २०० टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील (District) सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागातील वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवतात. यंदा त्या कमी असल्या तरी में अखेरपासून त्या वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात इगतपुरीला पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढल्याने एक टँकर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष टैंकर सुरु झालेला नसल्याचे वृत्त आहे. येत्या एक-दोन दिवसांत तो सुरु केला जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
विहिरी अधिग्रहणाची तयारी
यंदा चांगला पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील ४८४ गावे व ५६७ वाड्यांना एकूण १४७ टँकरचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्यामध्ये ४६ गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहण करण्यासाठी २० लाख ७० हजार, तर १४६ गावांतील खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ९५ लाख ३१ हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. ८१४ ठिकाणी टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
गंगापूर धरण समूहात ५९.४० टक्के पाणीसाठा
सध्या जिल्ह्यातील मोठ्या ७, मध्यम १७ धरणांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) समूहात ५९.४० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे वाढते चटके लक्षात घेतले असता एप्रिल व मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातून धरणातील पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरण साठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाणी पातळी कमी होऊन सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी देखील कमी होण्याची शक्यता असल्याने भविष्यात वाड्या वस्त्यांना टँकरची गरज भासण्याची शक्यता गृहित धरण्यात आलेली आहे.
गतवर्षी होते ३९९ टँकर
मागील ५-६ वर्षांत टँकर्सची संख्या गेल्यावर्षी पहिल्यांदा ४०० पर्यंत पोहोचली होती. जिल्ह्यात ३६६ गावे आणि ९४१ वाड्यांवरील ७ लाख २० हजार ३७२ लोकांना १३०७ ठिकाणी ३९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) सुरू होता. गतवर्षी सर्वाधिक ७२ टँकर नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) सुरू होते.