नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनाने गती घेतली असून रस्ते, रेल्वेस्थानक व पोलिसांचे गर्दीचे (Police Crowd) नियोजन याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रयागराज दौरा व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) झालेल्या आढावा बैठकीमध्ये विविध विभागांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
प्रयागराजमधील (Prayagraj) गर्दीचे अवलोकन केल्यानंतर नाशकात (Nashik) संभाव्य जादा गर्दी लक्षात घेता घाटांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली असून, प्रयागराज येथील अभियंत्यांच्या सूचनेप्रमाणे नाशिकमध्ये आणखी घाट बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासाठी प्रामुख्याने तपोवन संगमाच्या पलीकडील भागात घाट बांधणे, लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरील भाग, दसक पचक भागात गोदावरीच्या दोन्ही बाजूला घाट बांधण्याचा विचार करता येणे शक्य असल्याचे सूचवण्यात आले. त्याबाबत प्रत्यक्ष पहाणीतून निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांचे टेंडर काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या नियोजनाचा आढावा सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. एसटीपीचे टेंडर झालेले आहेत. रस्ते उभारण्यात जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे हे काम आता सुरू करणे गरजेचे असल्याने त्याचे तातडीने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या जोडणीतून काही प्रमाणात रिंग रोड तयार आहे. तो शहराच्या बाहेरून जाणारा आहे. सुमारे ९१ किलोमीटरचा हा रस्ता अस्तित्वात असलेले रस्ते जोडून नवा शहराबाहेरील रिंग रोड तयार होणार आहे. हा रस्ता रुंद करून त्याचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरून शहरा बाहेरून थेट निघून जाणाऱ्या वाहनांना मोकळा मार्ग मिळू शकेल. त्या दृष्टीने एनएच-३७ हा महामार्ग कोण उभारणार याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीडब्ल्यूडी व एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना देवदर्शनाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे व वाहनांची गर्दी टाळून त्याचे नियोजन करता यावे यासाठी नाशिक-त्रंबकेश्वर हा रस्ता सक्षम करणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला रस्ता वाढवून पदपथ तयार करण्याचा विचार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. तसेच सर्व रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग विकसित करावेत, कोपरगाव, सिन्नर-गोंदे, भरवीर, पिंपरी-सदो हे नाशिकला समृद्धी महामार्गाला जोडणारे रस्ते रुंदीकरण करून मुख्य रस्त्याला जोडली जातील. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एमएसआरटीसी यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) जोडून घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्ता विकसित केला जाईल. द्वारका ते सिन्नर, नांदूर शिंगोटे, शिर्डी एअरपोर्ट, नाशिक-कसारा, नाशिक धुळे, त्रंबक जव्हार-मनोर, वणी, कावनई-टाकेद-बेझे असे मार्ग सक्षम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या माध्यमातून त्या परिसरातील धार्मिकस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांना वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये हा त्यामागील हेतू आहे. तसेच नाशिक विमानतळ व शिर्डी विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुलभ ठेवणे गरजेचे आहे.
रेल्वेस्थानकाच्या विस्ताराचे नियोजन करा
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर चार फलाट आहेत. त्या व्यतिरिक्त पूर्वेकडील ११ एकर जागेवर अतिरिक्त फलाट उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, तसेच नाशिकला दाखल होणाऱ्या भाविकांसाठी ‘फोल्डिंग एरिया’ तयार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. नाशिकरोड स्थानकाजवळ मेट्रो स्टॅण्ड, नाशिक- पुणे रेल्वेचा स्टॉप, एसटी सिटीलिंकचा स्टॉप यांचे एकत्रित इंटिग्रेटेड हब उभारण्याचा प्रस्ताव व त्याचे पीपीपी मॉडेल तयार करण्याच्या सूचना आर्किटेक्ट यांना देण्यात आल्या.
साधुग्रामसाठी भाडेतत्त्वावर जागा
सद्यस्थितीत साधुग्रामची जागा ३७५ एकर एवढी आहे. ही जागा अपुरी पडणार असल्याने त्यात दुपटीने वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने नांदूरमानूरपर्यंतच्या जागेचा विचार करता येणे शक्य असल्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासनाने तातडीने याबाबतचा आढावा तयार करावा व जागांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वाहतूक नियोजनानुसार इतर सुविधा
कुंभमेळ्याच्या बैठकीत पोलीस प्रशासनाला वाहतुकीचा प्लॅन निर्धारित करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार त्यांना आवश्यक असणारा भाविकांच्या स्नानाला जाण्याचा व परतीचा मार्ग, आवश्यक असणारे घाटांची रस्ते व पार्किंग यासंदर्भात नियोजन मागवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गावरील सीसीटीव्हीच्या दिशा निश्चित केल्या जातील. त्यासोबतच पोलीस दलाला गरजेच्या वाटणाऱ्या इतर विभागांच्या कामांबाबत सूचनाही देण्याचे निर्देश दिले आहेत.