नाशिक | प्रतिनिधी
इंदिरानगर अंडरपासजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री एका तरुणीने मद्यधुंदावस्थेत भररस्त्यात राडा घातला. रस्त्याने जाणा-या नागरिकांसमोर अश्लील हावभाव करीत तिने गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मद्याच्या नशेत तरुणी बिधरल्याचा व्हिडिओ शुक्रवारी विविध समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलिसांवर टीका झाल्याने त्यांनी तरुणीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली.
इंदिरानगर बोगद्याबाहेरील जागेत पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केलेली व डाव्या हातावर टॅटू असलेली तरुणी मद्यधुंदावस्थेत बरळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘चलो हॉस्पिटल, मेडिकल करते हैं, मेडिकल में पता चलेगा कौन पिया हैं’, असे बोलत तरुणीने अश्लील हावभाव केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तेथे थांबलेल्या चारचाकी व दुचाकी चालकांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करीत कारवाईची मागणी केली. दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार घडल्यानंतर मद्यपी तरुणी बडबड करून निधून गेल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले. परंतु, तोपर्यंत तरुणी गाया झाली होती. ही घटना मुंबई नाका व अंबड पोलिसांच्या हद्दीच्या अगदी रेषेवर घडली आहे. मात्र, दोन्हीपैकी एकाही पोलीस ठाण्याने घटनेची नोंद करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. ही तरुणी पंचवीस वर्षांची असून, काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी पश्चिम बंगाल येथून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समजते.
पुन्हा हद्दीचा वाद
सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन करणाऱ्याऱ्यांना नियंत्रित करण्यासाठीही पोलीस हद्दीचा विचार करत असतील, तर नागरिकांनी आता करायच तरी काय?, अशी टीका होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून कोणतीही नोंद केली नाही. मुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्याच्या ‘प्रभारीं’नी थेट ‘आमच्या हद्दीत हा प्रकार घडला नाही’, असे सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. गंभीर बाब म्हणजे, वरिष्ठ कार्यालयापर्यंत हा व्हिडिओ पोहोचूनही तेथून कोणतीही सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आली नाही. त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
तरुणीला नोटीस
तरुणीने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्यानंतर पोलिसांनीही कानावर हात ठेवत ‘हा प्रकार आमच्या भागात नाही’, असे म्हणत ‘हद्द’ ओलांडली. त्यातच कोणत्याच पोलीस ठाण्याने घटनेची साधी कागदोपत्री नोंदही न केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. टीका झाल्यावर सायंकाळी मुंबई नाका पोलिसांनी संशयित तरुणीला ताब्यात घेत अंबड पोलिसांत पाठवले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा