नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिका एन कॅपच्या निधीतून आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात १०० इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक बस डेपो उभारत आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढच्या महिन्यात तो पूर्णपणे तयार होणार आहे. दरम्यान, नाशिक मनपाला केंद्र सरकारच्या पीएम ई-बस योजनेंतर्गत शंभर पैकी पहिल्या टप्प्यात एकूण ५० इलेक्ट्रीक बसेस मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीत लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे.
मनपाच्या बांधकाम विभागाच्या वतीने १०० इलेक्ट्रिक बसेससाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यात चार्जिंग स्टेशनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे प्रशासनिक इमारत, चालक वाहकांसाठी विश्रांतीगृह, कॅश कलेक्शन सेंटर आदी सुविधा राहणार आहे. केंद्र सरकारने बस पुरवठ्यासाठी जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या ऑपरेटरची निवड केली आहे. महापालिकेने या ऑपरेटरसोबत करारनामा करण्याची प्रक्रिया केली आहे. सध्या सिटीलिंक बससेवेच्या संचालनामुळे महापालिकेला अडीच वर्षांत सुमारे १०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बससेवेच्या खर्चाबाबत महापालिका सतर्क आहे.
दरम्यान ई बससाठी केंद्र सरकारकडून प्रति किलोमीटर २४ रुपये अनुदान मिळणार आहे. शहरी भागातील ध्वनीप्रदूषण कमी करण्यास इलेक्ट्रिक बसचा मोठा वाटा आहे. त्याच्या मोटरमध्ये जास्त यांत्रिक हालचाली नसल्याने इंधन इंजिनच्या तुलनेत कमी मेंटेनन्स लागतो. त्यामुळे बसचा कार्यकाळ वाढतो आणि खर्च कमी होतो. केंद्र आणि राज्य सरकारे इलेक्ट्रिक बससाठी अनुदान आणि कर सवलती देत आहे.
हे ही वाचा: Nashik Crime News: पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये ‘कोम्बिंग’ ऑपरेशन
ई-बस पर्यावरणपूरक असून दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर
पर्यावरणपूरक आणि स्वच्छ वाहतूकसेवा मिळणार.
कार्बन डायऑक्साइड आणि प्रदूषक वायूंचे उत्सर्जन होत नाही.
धूर, ध्वनी आणि हवेतील प्रदूषण कमी होते, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून हवामान बदलावर सकारात्मक परिणाम होतो.
कमी इंधन खर्च आणि किफायतशीर पर्याय
डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या बसांच्या तुलनेत विद्युत उर्जा स्वस्त आणि किफायतशीर असते.
प्रति किलोमीटर ऑपरेटिंग खर्च डिझेल बसच्या तुलनेत ४० ते ५०% कमी.
देखभाल खर्च देखील कमी
कमी ध्वनीप्रदूषण
ई-बसच्या इंजिनमध्ये कोणतेही ज्वलन होत नाही, त्यामुळे इंजिनचा आवाज खूप कमी येतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा