नाशिक | Nashik
सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) डांगराळे, शिंदे, रोकडपाडा आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली. अचानक झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास हा भूकंप झाला असून त्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली ४ किलोमीटर खोलीवर असून ते नाशिकपासून सुमारे ५३ किलोमीटर अंतरावर, शिंदे व रोकडपाडा परिसराच्या जवळ केंद्रित होते.
सुदैवाने, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाकडून (Administration) संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




