सिन्नर | वार्ताहर | Sinnar
सिन्नर निफाड रस्त्यावरील (Sinnar Niphad Road) कानडी मळ्याच्या पुढे असणाऱ्या कुटे मळ्याजवळ राजस्थानकडून येणारा आयशर संगमनेरकडे खारी, टोस्ट घेऊन जात होता. त्यावेळी आयशरला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आयशर पूर्णपणे जळून खाक झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनी (Citizen) आयशरला (Eicher) आग लागल्याचे बघताच नगरपरिषदेला कळविले. सुदैवाने चालकाने आधीच गाडीतून उडी मारल्याने तो बचावला
दरम्यान, यावेळी माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांच्यासह अनेकांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला (Fire Brigade) कळवल्यानंतर नगरपालिकेचा बंब घटनास्थळी पोहोचला. यावेळी आग आटोक्यात येत नसल्याने एमआयडीसीचाही बंब बोलवण्यात आला. सुमारे दीड ते दोन तासाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आयशर व त्यातील सर्व खारी, टोस्ट जळून (Burn) खाक झाले होते.




