नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभा व विधानसभा निवडणुकीपाठोपाठ (Loksabha and Vidhansabha Election) स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Election) तयारी गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेरीस संपुष्टात येत असल्याने जानेवारीत या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी गतिमान झाली असून सरपंचपद आरक्षणाच्या सोडतीची इच्छुकांना प्रतीक्षा आहे.
यंदाचे वर्ष हे निवडणूक (Election) वर्ष असल्याचे दिसून येत आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होताच राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात १३ तालुक्यांतील १९३ ग्रामपंचायतींची (Gram Panchayat) मुदत २०२४ या वर्षाअखेरीस संपुष्टात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने या गावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनांची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण केलेली आहे. मात्र गावनिहाय सरपंच (Sarpanch) सोडतीचा मुद्दा भिजत पडल्याने आयोगाची निवडणूक तयारी खोळंबल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाकडून (State Government) चालू महिन्यात सरपंचपद आरक्षण (Reservation) सोडतीचे आदेश निघण्याची शक्यता असून, त्यानंतर गावपातळीवर मतदार याद्यांचा (Voter List) कार्यक्रम राबवण्यात येईल. तो पूर्ण होताच आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रिया हिवाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता असल्याने या निर्णयाला जानेवारी महिना उजाडणार असल्याचा अंदाज आहे. पण गावपातळीवर इच्छुकांनी आतापासूनच निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तयारीला प्रारंभ केला असल्याचे चित्र आहे.
सरपंच आरक्षणाचे वाटप प्रलंबित
शासन पातळीवरून राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्र वगळता खुल्या वर्गातील १,४५२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाचे वाटप केले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १९६ पैकी पेसा क्षेत्र वगळता १०६ ग्रामपंचायतींकरता आरक्षणाचे वाटप केले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीच्या १३, ओबीसींसाठी २९ जागा राखीव असतील. तर ५६ सरपंचांच्या जागा या खुल्या प्रवर्गात असतील. कोणत्या गावांमध्ये सरपंचाची पदे राखीव होणार अन् कुठली पदे खुल्या प्रवर्गासाठी सुटणार याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.
मुदत संपलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
इगतपुरी – ६५
निफाड – ३२
बागलाण – २
त्र्यंबकेश्वर – १७
कळवण – १४
मालेगाव – ९
नांदगाव – ८
येवला – ८
नाशिक – ७
चांदवड – १
दिंडोरी -१
देवळा – १
पेठ – १
एकूण – १९३