नाशिक | Nashik
त्र्यंबकरोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Civil Hospital) प्रसूत झालेल्या नवमातांच्या डिस्चार्जवेळी मंगळवारी (दि.१५) रात्री थेट नवजात बाळांची (New Born Babies) आदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रसूतीवेळी जिल्हा रुग्णालयाकडूनच नातलगांना मुलाचा जन्म झाल्याचे सांगण्यात आले. पण डिस्चार्जवेळी मुलगी सोपवल्याने नातलग संतप्त झाले. नातलगांनी स्त्री जातीचे बाळ घेण्यास नकार देत आमचे बाळ आम्हाला द्या, अशी मागणी करत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. या बारभाई कारभारामुळे सिव्हिलचे उरलेसुरले नावही धुळीस मिळाल्याचा प्रत्यय आला.
तुम्हाला मुलगा झालाय, असे सांगून व रेकॉर्डवर तशी नोंद असूनही डिस्चार्ज (Discharge) देतेवेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी सोपविल्यात आल्याने प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक व सरकारवाडा पोलिसांकडे पोहोचले. संतप्त नातेवाईकांसह प्रहार संघटनेने सिव्हिल प्रशासनाला धारेवर धरून बाळ स्वीकारण्यास नकार दिल्याने मंगळवारनंतर बुधवारी (दि.१६) तणाव निर्माण झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी (inquiry) नेमलेल्या समितीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांना अहवाल सादर केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
नांदूरनाका परिसरातील (Nandoornaka Area) रूतिका महेश पवार ही महिला प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेने रविवार (दि.१३) रात्री ११.३० च्या सुमारास बाळाला जन्म दिला. बाळ पुरुष जातीचे असल्याचे परिचारिकांनी नातेवाईकांना सांगितले. प्रसूती कक्षातील रजिस्टरवर तशी नोंदही करण्यात आली. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला एसएनसीयू कक्षात हलवून उपचार सुरू करण्यात आले. बाळाच्या पोटात पाणी असल्याने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिला. मंगळवारी रात्री नातलगांनी डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली.
एसएनसीयूमध्ये बाळाचे डायपर बदलताना हातात असलेले बाळ मुलगा नव्हे तर मुलगी असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. आम्हाला मुलगा झाला असताना मुलगी कशी देता? असा सवाल करीत त्यांनी उपस्थित परिचारिकांना जाब विचारला. परंतु हे तुमचेच बाळ आहे असे परिचारिका सांगू लागल्या. नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील नोंदी तपासण्याची मागणी केली. रुतिका पवार यांच्या नावापुढे मुलगा झाल्याची नोंद होती. काहीतरी चुकीचे घडत आहे असे निदर्शनास आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली.प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांना याबाबत कळविले.
भडांगे यांनी तेथे पोहोचून हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घडल्या प्रकाराची सकाळी माहिती घेऊन चौकशी करतो असे त्यांना सांगण्यात आले.बुधवारी (दि. १६) सकाळी संबंधित नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमले. आम्हाला आमचा मुलगाच परत करा. आम्ही मुलगी (Gril) ताब्यात घेणार नाही असा पवित्रा स्वीकारला. तसेच, या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली. तसेच जोपर्यंत मुलगा परत मिळत नाही तोपर्यंत संबंधित मातेचा डिस्चार्ज घेऊन तिला घरी घेऊन जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी स्वीकारला. तर मातेच्या जीविताचे काही कमी जास्त झाल्यास ती जबाबदारी सर्वस्वी जिल्हा शल्य चिकित्सक आणि संबंधित डॉक्टर्स व परिचारिकांची राहिल असा इशाराही देण्यात आला आहे.
माताही आगतिक
बाळ परत मिळावे याकरता माताही अगतिक झाली आहे. दिवसभर नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात उपाशीपोटी थांबून होते. दुपारी तीनपर्यंत अहवाल देतो, असे त्यांना जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सायंकाळी सहापर्यंत अहवाल मिळू शकला नाही. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नातेवाईकांसह प्रहार संघटनेचे पदाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटले. त्यांनी नातेवाईकांसमोर अहवालाचे वाचन केले. प्रसूतीपूर्वी संबंधित महिलेची खासगी ठिकाणी सोनोग्राफी झाली होती. त्यावेळी गर्भाला पोटाचा विकार असल्याचे निदान झाले होते. प्रसूतीपश्चात स्त्री जातीच्या अर्भकाची सोनोग्राफी केली असता त्यामध्येही संबंधित बाळाला पोटाचा तोच विकार आढळल्याचा दावा चौकशी समितीने केला आहे
‘डीएनए’ शिवाय उलगडा नाही
हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले असून संबंधित बाळाची डीएनए टेस्ट होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नसल्याच्या निष्कर्षापर्यंत सिव्हिल प्रशासन आले आहे. त्यामुळे लवकरच बाळाचा डीएनए तपासण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. सिव्हिल प्रशासनाद्वारे डीएनए तपासणी करून घेतली जाणार असून नातेवाईकदेखील त्यांना खासगी ठिकाणी ही तपासणी करायची असेल तर करून घेऊ शकतात, असे सिव्हिल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करा, त्रयस्थ समितीद्वारे त्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज समितीने तपासले आहेत. कर्मचाऱ्यांसह नातलगांचे जबाबही नोंदवले आहेत.अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कठोर कारवाई करू.
चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक