Sunday, November 15, 2026
HomeनाशिकNashik News : दोन महिन्यांत प्रशासकीय फेरबदल; नाशिक पोलिसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे,...

Nashik News : दोन महिन्यांत प्रशासकीय फेरबदल; नाशिक पोलिसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे, नवीन नेमणुकांचे वेध!

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​आगामी सिंहस्थाच्या (Simhastha) पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस (Nashik City Police) दलाचे संपूर्ण रूपडे पालटणार असून, यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठे हाय-व्होल्टेज सुरक्षा कवच उभारले जात आहे. सन २०१५-१६ मधील गत सिंहस्थाच्या तुलनेत यंदा सुरक्षा यंत्रणेत तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तब्बल ३५ हजार २५५ पोलिसांच्या महाकाय फौजेसोबतच राज्यातील व देशातील अत्यंत संवेदनशील समजली जाणारी विशेष पथके नाशिकमध्ये डेरेदाखल होणार आहेत. या बंदोबस्ताच्या सूक्ष्म नियोजनासाठी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि अंतर्गत बदल्यांचे आदेश धडकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गर्दीचे (Crowds) नियंत्रणच नव्हे, तर कोणत्याही आपत्कालीन किंवा घातपाती परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. ३५ हजार २५५ पोलिसांच्या ताफ्यासोबतच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), तसेच राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ व एसडीआरएफ) ही विशेष पथके तैनात असणार आहेत. गर्दीचे प्रत्यक्ष नियोजन करण्यासाठी ४४८ पोलिस निरीक्षक आणि २ हजारांहून अधिक पोलिस उपनिरीक्षक मैदानात उतरणार आहेत.

दुसरीकडे, शहरातील (City) काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त पदी बढती मिळणार असल्याने, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी पोलिस ठाण्यांना नवे प्रभारी मिळतील. तसेच एप्रिल महिन्यात नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेणारे डॉ. डी. एस. स्वामी वगळता ग्रामीण दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतर निघणाऱ्या बदल्यांच्या आदेशाकडे संपूर्ण पोलीस दलाचे (Police Force) लक्ष आहे.

​वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र डीसीपी

सिंहस्थ काळात नाशिकमध्ये (Nashik) येणाऱ्या असंख्य भाविकांच्या वाहनांचे नियोजन करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शहरात प्रथमच वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्त (डीसीपी) नियुक्त केले जाणार आहेत. तसेच गत सिंहस्थात १३ असलेली उपायुक्तांची संख्या यंदा २७ वर नेण्यात आली आहे, तर सहायक आयुक्तांची (एसीपी) संख्या ४१ वरून १०६ करण्यात आली आहे. या तात्पुरत्या स्वरूपातील बदल्या आणि अतिरिक्त कार्यभाराचे नियोजन सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

​अनुभवी अधिकाऱ्यांचा पाया भक्कम

सिंहस्थाचे कामकाज अखंडित सुरू राहावे, यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपायुक्त मोनिका राऊत आणि किरणकुमार चव्हाण यांना सिंहस्थ कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. सहायक आयुक्त डॉ. संदीप बारी, शेखर देशमुख व संदीप मिटके यांनाही मुदतवाढ मिळाल्याची नोंद राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतली आहे. याशिवाय उपायुक्त किशोर काळे, चंद्रकांत गवळी आणि काही महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेले सहायक आयुक्त अद्विता शिंदे, माधव रेड्डी व प्रमोद वाघ हे अधिकारीही कार्यरत राहणार आहेत. या अनुभवी अधिकाऱ्यांच्या सोबतीला अतिरिक्त कुमक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या नवीन उपायुक्त व सहायक आयुक्तांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. 

ताज्या बातम्या

Nashik Crime News : रस्त्यावर ज्वलनशील स्टंटबाजी! उत्तमनगर परिसरात पेटते फटाके घेऊन...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik सणासुदीच्या आनंदावर विरजण घालत रहिवासी भागात पेटत्या फटाक्यांच्या लडी व ज्वलनशील पदार्थ हवेत फिरवून नागरिकांच्या (Citizen) जीवितास धोका निर्माण करणाऱ्या...