येवला | योगेंद्र वाघ | Yeola
कांद्याची (Onion) मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध हातमाग पैठणीचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र तसेच संभाजीनगर, नाशिक, धुळे व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांना (District) मध्यवर्ती ठिकाण, असा येवला शहराचा लौकिक आहे. येवला येथे रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. मात्र, या स्थानकावर अनेक एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस प्रवासी गाड्या थांबत नसल्याने परिसरातील नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, पैठणी विणकर या सर्वांचीच मोठी अडचण होते.
येवला स्थानकावर (Yeola Railway Station) एक्स्प्रेस, सुपर एक्सप्रेस प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासह सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी येवलेकरांनी रेल्वे प्रशासनाला सातत्याने निवेदने दिली, कधी आंदोलने केली. मात्र, केवळ रंगरंगोटीने रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यापलीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी अपेक्षित असे काहीही झालेले नाही. रेल्वेकडे मागण्या होऊनही येवला रेल्वेस्थानक दुर्लक्षितच राहिले आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असणाऱ्या येवला स्थानकाचा २०२१ मध्ये पुणे विभागात विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला.
गेल्यावर्षी हे स्थानक पुणे विभागात (Pune Divison) गेले. येवला रेल्वेस्थानक दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. स्थानकावर दोन फलाट, तीन मार्गिका असून विद्युतीकरण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड-दौंड-पुणे मार्गावर पॅसेंजर, एक्स्प्रेस व सुपर एक्स्प्रेस अशा तीसपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. यातील बन्ऱ्याच गाड्या आठवड्यातील सातही दिवस दररोजच आवागमन करतात. काही एक्स्प्रेस गाड्या विशिष्ट दिवशी धावतात.
दररोजच धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील (Railway Trains) केवळ गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, निजामाबाद पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस. दौंड निजामाबाद एक्सप्रेस या चारच प्रवाशी रेल्वे गाड्या सध्या येवला स्थानकावर थांबतात. इतर अनेक गाड्यांना येवला स्थानकावर थांबा नाही. अनेक एक्स्प्रेस व सुपर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना येवला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने येवलेकरांना या गाड्यांसाठी एकतर मनमाड स्थानक किंवा काही गाड्यांसाठी कोपरगाव रेल्वेस्थानक गाठावे लागते.
येवला परिसरातील (Yeola Area) व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी वर्ग यांना ये जा करण्यासाठी व माल वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेल्या येवला रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. त्याचबरोचर पुणे अमरावती, पुणे नागपूर, पुणे-साईनगर, दादर-साईनगर व झेलम एक्सप्रेस या प्रवाशी रेल्वेगाड्यांना येवले रेल्वे स्थानकात थांबा देण्याची येवलेकरांची मागणी आहे.
स्थानकावर बंद असलेली तिकीट आरक्षण खिडकी सुरू करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ चे काम तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. येवला रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन करोनाकाळानंतर उघडलेली नाही. प्रतीक्षालय बंद राहते, स्थानकाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच आहे. स्थानकावर दिवसा तर सोडाच; रात्रीच्या वेळीही रेल्वे पोलीसदलाचा एक जवानही तैनात नसतो. रेल्वेहद्दीत काही घटना घडली तरच रेल्वेपोलीस दिसतात.
सन २०२३ मध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे येवला रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करून स्थानकांचा प्राधान्याने विकास करावा, अशी मागणी केली होती. या योजनेत येवल्याचा समावेशही झाला होता. मात्र, नंतर त्या योजनेतून येवल्याचे नाव गायब झाले.
तीन दिवसांपूर्वी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी येवला रेल्वे स्थानकाला भेट देवून पाहणी केली. स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. रेल्वेचे प्रश्नही समजून घेतले. माजी मंत्री भुजबळ असो वा खासदार भगरे अथवा सत्ताधारी पक्ष कोणाकडूनही येवला रेल्वेस्थानकाचा कायापालट व्हावा व प्रवासी सुविधांसह एक्सप्रेस, सुपर एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना येवला स्थानकावर थांबा मिळावा, अशी सर्वसामान्य येवलेकरांची अपेक्षा आहे.
किफायतशीर स्थानक
येवला तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथील व्यापारीवर्गाकडून खरेदी केलेला कांदा हा रेल्वे रॅकद्वारे बाहेर पाठवला जातो. कांदा वाहतुकीमुळे मध्य रेल्वेला महिन्याकाठी सरासरी सुमारे दोन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय प्रवासी तिकिटांचे उत्पन्न मिळते ते वेगळेच!