Monday, June 15, 2026
HomeनाशिकNashik News : पोलीस भरतीसाठी 'आरएफआयडी'; २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या

Nashik News : पोलीस भरतीसाठी ‘आरएफआयडी’; २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या

एकाच दिवशी लेखी परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य पोलीस दलातील (State Police Force) मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी सुरू असलेल्या भरती मोहिमेत नाशिक ग्रामीण पोलीस दलाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील २१० शिपाई, ५२ वाहनचालक तसेच कारागृह विभागातील ११८ शिपाई अशा एकूण ३८० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी अधिसूचना जारी करत भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या होणार असून, उमेदवारांच्या धावण्याच्या कामगिरीची अचूक नोंद व्हावी यासाठी १०० मीटर व १६०० मीटर शर्यतीदरम्यान ‘चेस्ट नंबर’सोबत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफ आयडी) प्रणाली वापरण्यात येणार आहे. यामुळे वेळेतील फेरफार, बनवेगिरी किंवा दुसऱ्याच्या जागी धावण्यासारखे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथकांची नियुक्ती असणार आहे.

सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना (Candidate) यंदा अखेरची संधी देण्यात आल्याने अर्जाची संख्या लक्षणीय वाढली आहे. पूर्वीप्रमाणे विविध जिल्ह्यांत वेगवेगळ्या दिवशी लेखी परीक्षा न घेता यंदा बृहन्मुंबई वगळता राज्यभर एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक जिल्ह्यांत अर्ज करून संधी वाढवण्याचा मार्ग बंद झाला असून गुणवत्ता यादीतच प्राथमिक चाळणी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांत झालेल्या भरतीतून नियुक्त कर्मचारी सध्या सेवेत कार्यरत आहेत. आता नव्याने निवड होणारे उमेदवार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात तैनात होणार असल्याने ग्रामीण पोलीस दलाचे बळ वाढणार आहे.

अशी आहे ‘आरएफआयडी’ प्रणाली

रेडिओ लहरींच्या सहाय्याने ओळख पटवणारी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. एखादी व्यक्ती, वस्तू किंवा क्रमांकाची माहिती स्वयंचलित पद्धतीने वाचण्यासाठी याचा वापर केला जातो. यात तीन मुख्य घटक असतात. टॅगमध्ये लहान चिप असते. त्यात अत्याधुनिक क्रमांक, माहिती साठवली जाते, तर त्यातील रीडर हे रेडिओ सिग्नल पाठवून टॅगमधील माहिती वाचतो. यानंतर सॉफ्टवेअर प्रणाली वाचलेली माहिती संगणकात नोंदवते व विश्लेषण करते. मैदानी चाचणी वेळी उमेदवारांच्या छातीवर लावलेल्या ‘चेस्ट नंबर’ सोबत आरएफआयडी टॅग जोडला जातो. उमेदवार मैदानावरील ठराविक बिंदू पार करताच रीडर त्या टॅगची नोंद घेतो. वेळ स्वयंचलितरीत्या नोंदवली जाते.

असे आहेत निकष

मैदानी चाचणीत पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण) आणि गोळाफेक (१५ गुण) अशी एकूण ५० गुणांची परीक्षा असेल, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे अनिवार्य आहे. शारीरिक पात्रतेनुसार पुरुषांची किमान उंची १६५ सें.मी. व छाती ७९ ते ८५ सें.मी. तर महिलांची उंची १५५ सें.मी. असणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...