इंदिरानगर | प्रतिनिधी
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पांडवलेणी व बुद्ध स्मारकाच्या डोंगराजवळ वॉटर पार्कच्या वरती डोंगराला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. तर त्याच वेळेला पांडव लेणी डोंगरावर गेलेले काही पर्यटकही भयग्रस्त झाले. मात्र फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या अग्निशमन पथकाने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून १५ जणांची टीम आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
या आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती आहे. मात्र ही आग कशामुळे लागली आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलासोबत फॉरेस्टचे कर्मचारी अथक प्रयत्न करीत आहे. पांडवलेणी डोंगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून जंगली प्राण्यांसोबत मोर, लांडोर, बिबट्यांसारख्या प्राण्यांचा वावर असून या आगीमुळे या निसर्गसंपदेला धोका निर्माण झाला आहे. पांडवलेणी डोंगर तेथील प्राचिन गुफांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी पर्यटकांचा कायम राबता असतो, यासोबतच डोंगराच्या पायथ्याशी ऐतिहासिक बौध्दस्मारक असून शेजारी फाळकेस्मारक आहे. दरम्यान, ही आग लवकरात लवकर विझवण्यासाठी स्थानिक अग्नीशमन दलासोबत स्थानिक नागरिकांकडून देखील प्रयत्न सुरु आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा