नवीन नाशिक | प्रतिनिधी
विल्होळी येथील जैन मंदिर परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका कंपनीला सोमवारी (दि .९) रात्री सव्वादहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचा भडका आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले.
पेपर कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच नवीन अग्निशमन केंद्राचे स्टेशन जगदीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फायरमन मुकुंद सोनवणे, शंतनू जोशी, तेजस वाघ तसेच वाहनचालक इस्माईल काझी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
आगीचा भडका आणि धुराचे प्रमाण मोठे असल्याने अतिरिक्त अग्निशमन वाहनाची आवश्यकता भासली. त्यामुळे सातपूर अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून तेथूनही वाहन पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, कंपनीला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




