Sunday, April 20, 2025
HomeनाशिकNashik News : चामर लेणीवर अडकलेल्या युवकांची सुटका; अग्निशामक दल व म्हसरूळ...

Nashik News : चामर लेणीवर अडकलेल्या युवकांची सुटका; अग्निशामक दल व म्हसरूळ पोलिसांचे शर्थीचे रेस्क्यू ऑपरेशन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

चामर लेणीच्या (Chamar Leni) टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन युवकांची (Youth) रस्ता चुकून धोकादायक उतारावर अडकण्याची घटना शनिवारी (दि. १९ एप्रिल) घडली. परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांनी सकाळी मदतीसाठी अग्निशामक दल व म्हसरूळ पोलिसांशी (Mhasrul Police) संपर्क साधला. जवानांनी वेळीच हस्तक्षेप करत सुमारे अडीच तास चाललेल्या शर्थीच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर दोघांची सुखरूप सुटका केली.

- Advertisement -

साहिल जयसिंग टिळे आणि ओम प्रकाश यादव (रा. उपनगर) हे दोघे चामर लेणी परिसरात ट्रेकिंगसाठी गेले होते. काही अंतर चढून गेल्यावर त्यांचा मार्ग चुकला आणि ते एका तीव्र उतारावर अडकले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी “माझा हात सटकू शकतो, आम्हाला वाचवा…” असा मदतीचा संदेश पोलिस आणि अग्निशामक नियंत्रण कक्षाला दिला.

तत्काळ कृती करत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संजय चिखले, अंमलदार नितीन पारधे आणि पंचवटी अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायरमन संजय कानडे, फायरमन बाळासाहेब लहांगे, वाहन चालक प्रकाश मोहिते, शिकाऊ फायरमन प्रणय बनकर, ऋषिकेश जाधव, सिद्धांत गोतीस हे संपूर्ण पथक घटनास्थळी पोहचले. मदतीसाठी वैनतेय संस्थेचे परदेशी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगावकरही उपस्थित होते.

पथकाने डोंगराच्या पायऱ्या व कच्च्या रस्त्याने चढाई करत, खालच्या उतारावर अडकलेल्या युवकांना पाहिले. थेट पोहोचण्यासाठी रस्ता (Road) नसल्याने दुसऱ्या बाजूने डोंगरमाथ्यावर जाऊन मोठ्या खडकाला दोर बांधून खाली दोर टाकण्यात आला. प्रथम एकाला व नंतर दुसऱ्याला दोराच्या सहाय्याने वर ओढून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

यानंतर युवकांना पाणी देऊन धीर दिला गेला. त्यानंतर त्यांना डोंगर उतरून पोलिस चौकीमध्ये आणण्यात आले. अंमलदार गणेश नागरे यांनी चौकशी करून नोंद घेतली व म्हसरूळ पोलिस स्टेशनचे अंमलदार नितीन पारधे यांच्याकडे सुपूर्द केले. या धाडसी आणि समन्वयपूर्ण ऑपरेशनमुळे मोठा अनर्थ टळला असून, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या