नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा तसेच स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी विविध विकास कामांना मंजुरी देताना महापालिकेत रखडलेली अधिका-यांची पदोन्नतीला देखील महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महासभेने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अभियंता अशा एकूण १६ जणांना बढती दिली आहे. तर नऊ जणांना पदोन्नती नाकारण्यात आली. मनपा भुयारी गटार व मलनिस्सारण अधीक्षक अभियंतापदी रवींद्र धारणकर यांना पदोन्नती मिळाली. मागील वर्षात लोकसभा, शिक्षक व नंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. तसेच माजी प्रशासन उपायुक्त घोडे-पाटील यांच्याकाळात बांधकाम विभागात जम्पिंग प्रमोशन झाल्याने काहीजण न्यायालयात गेले होते. एकूणच या प्रक्रियेला ग्रहण लागले होते. मात्र आयुक्तपदी रुजू होताच मनीषा खत्री यांनी पदोन्नतीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या अध्यक्षते खालील समितीने कागदपत्र, तांत्रिक बाबी व सेवा ज्येष्ठता या निकषांची पडताळणी करत पदोन्नती प्रक्रिया मार्गी लावली. महिनाभरापूर्वीच महासभेवर पदोन्नतीचा विषय मंजुरीसाठी ठेवला जाणार होता. परंतु काही कारणास्तव तो मागे घेण्यात आला. त्यामुळे पदोन्नतीसाठी देव पाण्यात बुडवलेल्यांची धाकधूक वाढली होती.
पदोत्रती खालीलप्रमाणे
अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर (मलनिस्सारण व पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, प्रकाश निकम, संजय आहेसरा, नवनीत भामरे, विशाल गरुड, रवींद्र बागूल, वाहतूक शाखा- नरेंद्र शिंदे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा