त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज (गुरुवारी) पाहणी दौऱ्यात आढावा घेतला. दर्शन पथ, त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी नदी, कुशावर्त तीर्थ तसेच तालुका मध्यवर्ती इमारतीच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरातील अंतर्गत संवर्धनाची (Renovation) कामे भारतीय पुरातत्व विभागाकडून (ASI) केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी येत्या १५ किंवा १६ ऑक्टोबरपासून त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) भाविकांसाठी दोन महिने बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbhmela) देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक, साधू-संत, महंत व विविध आखाडे त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता, वाहतूक, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणत्याही परिस्थितीत भाविकांना (Devotees) अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले.
विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना
त्र्यंबकेश्वर परिसरात दर्शनपथ, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अतिक्रमणे हटविणे, नाले बांधणे, विद्युत व्यवस्था, घाटांची उभारणी, फरशी बदलणे तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांना गती देतानाच कामांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या. प्रारंभी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती इमारतीच्या कामाची पाहणी केली. मध्यवर्ती इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करताना बांधकामाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच कुशावर्त तीर्थ येथे मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत असल्याने गर्दीचे प्रभावी नियोजन करावे, असेही त्यांनी म्हटले.
मंदिर परिसरातील कामांसाठी दर्शन व्यवस्था
मंदिर परिसरातील विविध कामे मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असताना पूर्ण करणे अडचणीचे ठरत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर काही कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत विश्वस्त मंडळाशी चर्चा करण्यात आली आहे. मंदिरातील पूजा-अर्चा सुरू ठेवून भविष्यात भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. अंतिम तारीख विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर निश्चित करण्यात येणार आहे. भाविकांना निर्णयाची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित कामे दिवस-रात्र सुरू ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळणे आणि कामे सुरक्षितपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे, या दोन्ही बाबींचा समन्वय साधण्यात येणार आहे.
स्वच्छता आणि भाविकांच्या सुविधांना प्राधान्य
त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची मोठी वर्दळ लक्षात घेता शहराची नियमित स्वच्छता कायम ठेवावी. दर्शन पथ, मंदिर परिसर, गोदावरी नदी, कुशावर्त तसेच प्रमुख रस्ते आणि घाट परिसरात स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पुरेशा प्रमाणात उपलब्ध असाव्यात. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच नगर प्रदक्षिणावेळीचे गर्दीचे नियोजन काटेकोरपणे करावे. असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहणाच्या अनुषंगाने उपलब्ध असलेला कालावधी लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. कामांमध्ये विलंब होणार नाही तसेच गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद राहण्याची शक्यता
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहण्याबाबत सांगितले की, मंदिरातील अंतर्गत संवर्धन आणि डागडुजीचे काम भारतीय पुरातत्व खात्याकडून केले जाणार आहे. त्यासाठी मंदिर काही दिवस बंद ठेवावे लागेल. मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख अजून पूर्णपणे निश्चित झालेली नसली, तरीही लवकरच ही तारीख निश्चित करून भाविकांच्या माहितीसाठी अधिकृतपणे जाहीर केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंदिर ट्रस्टकडूनही याबाबतच्या आवश्यक सूचना प्राप्त झाल्या असून, त्यांच्याकडून लवकरच तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंदिर बंद राहिले तरी अंतर्गत नित्य नैमित्तिक पूजा सुरू राहतील, असेही ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बैठकीस प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह मंदिर संस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते.




