नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे (Gopinath Rao Munde) यांनी भगवानगड या पवित्र तीर्थक्षेत्री सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा ही केवळ एक वार्षिक सोहळा नसून ती सामाजिक समतेची, वंचितांच्या न्याय्य हक्कांची आणि जनसामान्यांच्या आत्मसन्मानाची प्रेरणादायी चळवळ आहे. हीच वैचारिक परंपरा मंत्री पंकजा मुंडे अखंडितपणे पुढे चालवत आहेत. यंदाचा दसरा मेळावा मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होत असून, या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) समाजबंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस व ‘नामको’ बँकेचे माजी चेअरमन हेमंत अप्पा धात्रक यांनी केले आहे.
सामाजिक समतेचा आणि वंचितांच्या न्यायाचा लढा
स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्यांच्या (Dasara Melava) माध्यमातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. हा मेळावा कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून तो सर्वसामान्य जनतेच्या भावना आणि सामाजिक न्यायाचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या मेळाव्याची खरी ताकद जनसामान्यांच्या सहभागात आणि समाजाच्या एकजुटीत आहे, असे प्रतिपादन हेमंत धात्रक यांनी केले.
सावरगाव घाट येथे २० ऑक्टोबरला सोहळा
राष्ट्रसंत भगवान बाबा (Bhagwan Baba) यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा, जि. बीड) येथील भगवान भक्तीगडावर मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अस्मिता आणि स्वाभिमानाची परंपरा
स्व. मुंडे साहेबांनी सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेला विश्वास, संघर्षाची प्रेरणा आणि वंचितांना दिलेला न्यायाचा लढा हीच या परंपरेची खरी ओळख आहे. हा विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या मेळाव्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन धात्रक यांनी केले.
प्रमुख मान्यवरांचे उपस्थित राहण्याचे संयुक्त आवाहन
या दसरा मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार किशोर दराडे, आमदार गोकुळ गीते, संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गणेश गीते, उदय घुगे, उदय सांगळे, दामोदर मानकर, नारायणराव काकड, प्रकाश घुगे, बाळासाहेब गामणे, प्रल्हाद अप्पा काकड, शरद बोडके व वसंत विंचू या प्रमुख मान्यवरांनी संयुक्तपणे केले आहे.




