नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
शहरात नायलॉन मांजामुळे (Nylon Manja) गेल्या काही वर्षांत अनेक निर्दोष नागरिक, दुचाकीस्वार, पक्षी जखमी होण्याच्या घटना घडल्या होत्या. प्रतिबंध असूनही गुपचूपपणे नायलॉन मांजा विक्री आणि वापर करण्याच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचे दोन पथके थेट फ्लॅटच्या गच्च्यांपर्यंत पोहोचून तपासणी करायला सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.
अनेक सोसायट्यांतील तरुण मुले, अल्पवयीन मुले, काही पतंगप्रेमी उंच इमारतींच्या टेरेसवर गुप्तपणे नायलॉन मांजा वापरत असल्याचे गेल्या काळात समोर आले होते. यावेळी नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये, याकरिता पोलिसांनी परिसरातील गच्च्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अंबड पोलिसांचे (Ambad Police) दोन विशेष पथक प्रत्येक सोसायट्यांना भेट देऊन टेरेसवर ठेवलेले पतंग साहित्य, मांजाच्या रिळांचे अवशेष, काचेचा पुडा मिसळलेला दोर, नायलॉनचे तुकडे आढळल्यास तत्काळ जप्ती आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहे.
काही सोसायट्यांनी स्वयंप्रेरणेने गच्ची लॉक ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही तपासण्याही सुरू आहेत. पोलिसांनी पालकांनाही आवाहन केले आहे की मुलांकडून नायलॉन मांजा विकत घेतला जात नाही ना, याची काळजी घ्यावी. नायलॉन मांजाची धार इतकी तीक्ष्ण असते की छोट्या वाऱ्याच्या झोतातही ती मानेवर, हातावर गंभीर जखमा करू शकते. यापूर्वी काही जणांचे यामुळे मृत्यू देखील झाले या आहेत.
दरम्यान, या कडक तपासणीमुळे काही नागरिकांनी (Citizen) समाधान व्यक्त केले, तर काहींनी गच्चीवर पोलीस येणार याबद्दल थोडीशी धास्ती व्यक्त केली आहे. तरीही सुरक्षा लक्षात घेता ही मोहीम सुरू राहणार असून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाचा पूर्णतः बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारे, वापरणारे, बाळगणारे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. जर अल्पवयीन मुले नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल.
- जगवेंद्रसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे





