नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सरकारी तिजोरीवरील वाढलेला भार हलका करण्यासाठी नेहमीच हक्काचे ठरणाऱ्या मद्याच्या दरामध्ये (Alcohol Rate) मोठ्या प्रमाणात वाढ करूनही ग्राहक काही मागे हटत नाही. उलट दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत असून चौदा वर्षांनंतर तब्बल ७५ रुपयांनी मद्याचा दर वाढला आहे. मात्र मद्य महागाईच्या फेऱ्यात असले तरी ग्राहक मात्र जोरातच असून कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चिन्ह आहे.
‘ओल्ड मंक ट्रिपल एक्स’ रमची १८० मिली कार्टर मद्यपींना १४५ रुपयांहून आता थेट २२० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. म्हणजे या मद्यासाठी ग्राहकास ७५ रुपयांची अतिरिक्त झळ सोसावी लागत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत देशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य तसेच विदेशी मद्याच्या प्रीमियम ब्रॅण्डच्या दरात जवळपास ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली असून अनेक मद्यपींनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या वाढत्या बोजामुळे ही जास्तीची दरवाढ केल्याचा दावा केला आहे. तिजोरीवरील भार व योजनांचा समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने (State Government) ‘लाडक्या बहिणींच्या भावाच्या खिशात’ या पद्धतीने हात घालून शुद्ध फसवणूक केल्याचे काही मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर अनेकांनी इतरांच्या काळजीसह जनरल नॉलेजसाठी भाववाढीचे ‘नवे रेट कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
दरम्यान, देशी आणि विदेशी मद्याच्या दरांमध्ये ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून याशिवाय परवाना शुल्कही वाढवल्याने सरकारने घेतलेल्या दरवाढीच्या निर्णयाला राज्यातील हॉटेल आणि परमिट बार असोसिएशनकडूनही विरोध दर्शवला आहे. दरवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) याविरोधात एक दिवस आस्थापना बंद ठेऊन हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी विरोध केला होता. त्यामुळे सोमवारी (दि. १४) राज्यात अनेक ठिकाणी हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी बंद पाळला होता. दरम्यान, बिअर व वाईन घेणाऱ्यांना दरवाढीचा किंचित शॉक बसला आहे.
५७ हजार कोटींवर पोहोचणार महसूल
सन २०२४-२५ मध्ये राज्य सरकारला उत्पादन शुल्कातून ४३ हजार ५९९ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मद्याचे दर वाढल्यामुळे सन २०२५-२६ मध्ये हा महसूल ५७ हजार कोटींपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच या दरवाढीतून सरकारला दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरांमध्ये सर्वाधिक ५० ते ९६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती मद्य विक्रेत्यांनी दिली. व्हिस्कीच्या १८० एमएलच्या क्वार्टरसाठी मद्यपींना पूर्वी १६० ते १९० रुपये मोजावे लागत. परंतु आता त्यासाठी २२० ते २४० रुपये म्हणजेच ६० ते ९० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. वोडका या मद्य प्रकारासाठी ७० ते ८० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. विशेष करून ९० मिली, १८० मिली व ७५० मिली आणि एक हजार मिली विविध इंडियन मेड फॉरने लिकर (आयएमएफएल) मद्याच्या बॅण्ड व मिलीलिटरनुसार ही दरवाढ लागू झाली आहे.
भाववाढ अशी
देशी मद्य- ३० ते ८० रुपये
महाराष्ट्रनिर्मित मद्य- १४८ ते १७० रुपये
भारतीयनिर्मित विदेशी मद्य २०० ते ३०० रुपये
विदेशी प्रीमियम बॅण्ड – ३६० ते ४४० रुपये




